घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्लक्षित मुद्दे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी त्यांच्या जयंतीदिनी प्रकाशात आणले. डॉ. आंबेडकर यांनी पाण्याचे महत्त्व ओळखले होते. देशातील पहिला प्रकल्प भाक्रा नानगलची संकल्पना त्यांनी मांडली. कमी वीज उत्पादन करणाऱ्या राज्यांना जास्त वीज उत्पन्न करणाऱ्या राज्यांकडून वीजपुरवठा करता यावा, यासाठी पॉवर ग्रीड कार्पोरेशन स्थापनेचा निर्णय त्यांनी घेतला, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पवार बोलत होते. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, कुलपती के. बी. पवार, कुलगुरू पी. एम. राजदान, पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे आदी उपस्थित होते. कृषितज्ज्ञ प्रा. एम. एस. स्वामिनाथन व इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी बहाल करण्यात आली.
स्वामिनाथन, कस्तुरीरंगन व पुरंदरे यांच्या कार्याचा आढावा घेत पवार यांनी आपल्या भाषणात त्यांचे कौतुक केले.
पवार म्हणाले, देशामध्ये आरोग्यसेवा पुरवण्याचे महत्त्वाचे आव्हान आहे. विद्यापीठाने शिक्षण देताना उत्कृष्ट आरोग्य सेवा तसेच व्यवस्थापन, उद्योजक घडवण्याचे शिक्षण देण्यावर भर द्यावा. तसेच, तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा समाजाच्या गरजांसाठी उपयोग करता येईल का, याचा विचार करावा. काही वर्षांपर्यंत भारत अन्नधान्यांच्या क्षेत्रात आयात करणारा देश होता. मात्र, परिस्थिती झपाटय़ाने बदलत गेली व आता भारताकडून मोठय़ा प्रमाणात उत्पादन व निर्यातही होते. जागतिक पातळीवर अन्नधान्याचे उत्पादन करणाऱ्या देशात भारत महत्त्वाचा देश असून लाखो टन अन्नधान्यांची निर्यात करून मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन भारताला मिळते आहे. यामुळेच आपण अन्नसुरक्षा कायदा आणू शकलो. लवकरच देशातील ७० टक्के जनतेला अतिशय कमी खर्चात रोजचे जेवण मिळू शकेल, असे ते म्हणाले.
स्वामिनाथन म्हणाले, देशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये शेतीचा टक्का कमी होतो आहे, ही चिंतेची बाब आहे. अन्नसुरक्षा कायद्यानंतर देशातील ७० टक्के लोकांना अन्नाची खात्री मिळू शकेल. देशातील उपलब्ध साधनस्रोतांचा विकासामध्ये रूपांतरण करण्याचे मोठे आव्हान आहे. कस्तुरीरंगन म्हणाले, तंत्रज्ञानाचा केवळ विकास करून उपयोग नाही. तर त्याचा देशाच्या गरजांसाठी कसा मेळ घातला जातो हे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान समाजासाठी जोडले जायला हवे. पुरंदरे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे चरित्र महान आहे, त्याचे विस्मरण होऊ शकत नाही. गेली ८५ वर्षे या एकाच विषयाचा ध्यास असून अखेपर्यंत कायम राहील. महाराजांचा इतिहास लवकरच इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९७२ च्या दुष्काळाची आठवण
राज्यमंत्रिमंडळात १९७२ मध्ये आपण राज्यमंत्री होतो, तेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता. १९७४ मध्ये आपण कृषिमंत्री झालो. दिल्लीला जगजीवनराम व प्रा. स्वामिनाथन यांना भेटलो. तेव्हा झालेल्या प्रदीर्घ चर्चेत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या, त्याची अंमलबजावणी केल्याने तीन वर्षांत स्वयंपूर्ण बनलो, अशी आठवणही शरद पवार यांनी यावेळी सांगितली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ambedkars contribution in water energy area is too important sharad pawar
Show comments