भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील आंबडवे गावाचा कायापालट करण्याचे नियोजन शासनस्तरावर सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात वैयक्तिक लक्ष घातले आहे. केंद्रीय रस्तेबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांच्या विविध कामांसाठी ३५० कोटींचा निधी दिला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० कोटी देण्याची घोषणा केली आहे. आधुनिक तंत्राचा वापर करून या ठिकाणी बाबासाहेबांचे भव्य स्मारक व शिल्पसृष्टी उभारण्यात येत असून आंबडवे पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनीही कंबर कसली आहे.
आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे
केंद्र शासनाच्या सांसद ग्रामविकास योजनेअंतर्गत भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी आंबडवे गावाची निवड केली. जेमतेम २५४ लोकवस्ती व ७६ कुटुंबसंख्या असलेले हे गाव लोकसंख्येच्या निकषात (तीन ते पाच हजार) बसत नव्हते. मात्र, मोदींनी वैयक्तिक लक्ष घालून विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून दिली. मुंबईत इंदू मिलच्या कार्यक्रमात बोलताना, मोदींनी बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या पाच स्थानांपैकी (पंचतीर्थ) आंबडवे हे एक असल्याचा आवर्जून उल्लेख केला. केंद्र व राज्य सरकार आंबडवेच्या पाठीशी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, उच्चस्तरीय पातळीवर नियोजन सुरू झाले. आंबेडकरांचे भव्य स्मारक व शिल्पसृष्टी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आंबेडकरांचे मूळ घर असलेल्या जागेवर त्यांचे स्मारक व शेजारील जागेत शिल्पसृष्टी होणार आहे. दिल्लीतील अक्षरधामच्या धर्तीवर, संगीत कारंजे, लेझर शो आदींचा समावेश असून बाबासाहेबांच्या उपलब्ध चित्रफितींचा आधार घेत अॅनिमेशनचा वापर करून बाबासाहेबांच्या मुखातून त्यांचेच आत्मकथन होत असल्याचे पाहायला मिळणार आहे. संसद, चवदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रह आदी ठिकाणी त्यांनी केलेली भाषणे या माध्यमातून ऐकायला मिळणार असून थेट बाबासाहेबांचे दर्शन होत असल्याचा अनुभव घेता येणार आहे. तीन मजली शिल्पसृष्टीत भगवान गौतम बुद्धांची ६५ फुटी मूर्ती असणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाला आंबडवे गाव जोडण्यासाठी ३५ किलोमीटरचा रस्ता व त्यासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी गडकरी यांनी दर्शवली आहे. आंबडवेपासून जवळच असलेल्या हरिहरेश्वरला मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात, ते सर्व आंबडव्याला यावेत, यासाठी प्रयत्न सुरू असून यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्री निवास बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी ठेवला आहे. कोकण विकासाच्या मुद्दय़ावरील चर्चेत बोलताना मुख्यमंत्र्यांनीही आंबडवेसाठी ४० कोटी देण्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी विधिमंडळात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा