पिंपरी : शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रचारात रंगत वाढली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे दोघे सोमवारी (२९ एप्रिल) खेडमध्ये एकत्र आले. दोघांनीही एकमेकांचे पाय धरले. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरुर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरची लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्याकडून सातत्याने डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला जातो. तसेच डॉ. कोल्हे आणि आढळराव यांच्यातही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असे असताना सोमवारी दोघेही एकत्र आले. खेडमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले होते. डॉ. अमोल कोल्हे हे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या पाया पडले. यानंतर आढळराव हे देखील डॉ. कोल्हे यांच्या पाया पडले. खासदार डॉ. कोल्हे यांनी ज्येष्ठत्व म्हणून आढळराव यांचे पाय धरले असले, तरी आढळरावांनी पाय धरण्यामागे त्यांना डॉ. कोल्हेंचा आलेला पूर्वानुभव तर नसेल ना? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली. यावेळी दोघे शेजारी बसून संवाद साधतानाही दिसून आले. आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा…पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ‘दिग्विजय पगडी’ने होणार सत्कार

खासदार डॉ. कोल्हे यांनी आढळराव-पाटील यांच्या समोर महायुतीविरोधात जोरदार भाषण केले. सन २०१४ मध्ये घरगुती गॅसचे दर चारशे रुपये होते. त्या गॅसला नमस्कार करून मतदानाला जा असे पंतप्रधान मोदी त्यावेळी म्हणाले होते. आता तर गॅसचे दर अकराशे रुपये झाले आहेत. त्यामुळे आता तीनवेळा नमस्कार घालून मतदानाला जावे. तसेच शेतकऱ्यांनी मतदानाला जाताना दिल्लीच्या सीमेवर जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांचे स्मरण करावे. ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावार गाड्या घातल्या त्यांचे वडील मोदींच्या मंत्रिमंडळात होते, हे विसरू नका, असे आवाहनही डॉ. कोल्हे यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr amol kolhe and shivajirao adhalrao patil came a together for a programme in khed and held each other legs pune print news ggy 03 psg
Show comments