छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवला जावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अभिवादनासाठी शिवनेरीवर येण्याची शक्यता असताना कोल्हे यांनी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा- पुणे : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोल्हे स्वतः जुन्नरचे रहिवाशी असून त्यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवनेरी किल्ला येतो. गडावर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावावा यासाठी कोल्हे यांनी लोकसभेत मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीला कोणी दाद दिली नाही. त्यामुळे आता त्यांनी शिवनेरीवर शासकीय शिवजयंतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज नाही याकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘शिवजयंती साजरी करणारच, पण शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार’ अशी घोषणा कोल्हे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांकडे पत्रव्यवहार करूनही पुरातत्त्व विभाग नियमांवर बोट ठेवून परवानगी देण्याचे टाळत आहे, याकडे कोल्हे यांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा- ‘श्वास घ्यायला त्रास अन् नाकात ऑक्सिजन नळी’, भाजपाच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट मैदानात
नुकत्याच झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना ‘केंद्र सरकार ३७० कलम हटवू शकते तर, ब्रिटीशकाळात अस्तित्वात आलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमात बदल का करु शकत नाही? असा सवाल कोल्हे यांनी केंद्र सरकारला विचारला होता.