पिंपरी : महायुतीचे पर्यायी (डमी) उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने सत्तेचा गैरवापर केला जाऊ लागला आहे. त्यांना कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली आहे. दत्तक घेतलेल्या गावातील लोकांवरच दडपशाही केली जात आहे. सभेला जाऊ नये, म्हणून कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविल्याचा आरोप शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रचारावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे या वेळी उपस्थित होते.
ही निवडणूक आता माझी राहिली नाही. सर्वसामान्य जनतेने हातात घेतली आहे. भोसरी, हडपसर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरमध्ये प्रत्येक ठिकाणी जनतेचा निर्णय झाला आहे. जनता आता फक्त मतदानाची वाट पाहत असल्याचे सांगत डॉ. कोल्हे म्हणाले, की तीन वेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दत्तक घेतलेल्या करंजविहिरे गावामधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सभेला जाऊ नये, यासाठी नोटिसा पाठविल्या. आढळराव यांना कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली आहे. दत्तक घेतलेल्या गावातील लोकांवरच दडपशाही केली जात आहे. नोटिसा पाठविण्याची वेळ येत असेल तर आढळराव यांना पराभव स्पष्ट दिसायला लागला आहे. दडपशाही सुरू असून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत जनता उभी आहे.
हेही वाचा : मराठा, धनगर समाजाला आरक्षण; राहुल गांधी यांचे आश्वासन
कोल्हे यांनी काहीच कामे केली नाहीत : आढळराव
‘मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी निवडणुकीला उभा आहे. कोणावर टीका करणार नाही. देशात पुन्हा मोदी यांचे सरकार येणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे त्याच विचारांचा प्रतिनिधी असेल तर निधी आणायला अवघड जाणार नाही. अनेक प्रकल्प मला प्रत्यक्षात उतरवायचे आहेत,’ असे शिवाजीराव आढळराव-पाटील म्हणाले. ते म्हणाले, की मी जिथे जिथे जातो, तेथील लोक आम्ही चुकलो असे सांगतात. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकांची काहीच कामे केली नाहीत. त्या आधी १५ वर्षांत मी ठळक कामे केली आहेत. समाजमाध्यमावर माझ्याबाबत नकारात्मक वातावरण तयार करण्यात आल्याचेही आढळराव यांनी स्पष्ट केले.