लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने खांदेपालट केले असून शिवसेनेच्या पुणे, पिंपरीच्या संपर्कप्रमुखपदी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी, ही जबाबदारी डॉ. नीलम गोऱ्हे व त्यानंतर, खासदार गजानन कीर्तीकर यांच्याकडे होती.
शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी ही माहिती दिली. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे क्षेत्र आणि मावळ विधानसभेसाठी डॉ. कोल्हे संपर्कप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हे शिवसेनेत आले. लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारसभांची धुरा सांभाळली. आता त्यांना संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी कीर्तिकरांकडे ही जबाबदारी होती, ते आता मुंबईतून खासदार झाले आहेत. दिल्ली व मुंबईच्या दौऱ्यातून व खासदारकीच्या जबाबदारीतून त्यांना संपर्कप्रमुखपदासाठी पुरेसा वेळ देत येत नव्हता. त्यामुळे नव्या दमाच्या आणि पुण्यातील रहिवासी असलेल्या कोल्हे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याखेरीज, सातारा, सांगलीच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी नितीन बानगुडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Story img Loader