पुणे : ‘देशातील वैद्यकीय व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. त्यात वैद्यकीय शिक्षण, औषधनिर्मिती क्षेत्र, प्रयोगशाळा, रुग्णालये या सर्वच स्तरांवर बदल आवश्यक आहेत. मात्र, त्यात अनेक आव्हानेही आहेत,’ असे मत ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी मांडले. हॅलो मेडिकल फाऊंडेशन, साधना प्रकाशनातर्फे अतुल देऊळगावकर यांच्या ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या पुस्तकाचे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्यावेळी डॉ. फडके बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनीषा गुप्ते, फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. शुभांगी अहंकारी, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रात पुढील पिढ्या घडवण्याचे काम डॉ. अहंकारी यांनी केल्याचे नमूद करून डॉ. फडके म्हणाले, ‘डॉ. अहंकारी यांनी चळवळीच्या स्वरूपात काम केले. महिलांचे सक्षमीकरण केले. त्यांनी ग्रामीण भागात उभे केलेले काम फार महत्त्वाचे आहे. त्यांचे काम जवळून पाहता आले. आज देशातील ५० टक्के वैद्यकीय महाविद्यालये खासगी आहेत. वैद्यकीय पदवीला कोट्यवधी रुपये लागतात. या विद्यार्थ्यांना वैद्यकीयदृष्ट्या काहीही कळत नाही. सरकारी महाविद्यालयातही वेगळी स्थिती नाही. हा व्यवस्थेचा दोष आहे. सगळ्या सुविधा, तंत्रज्ञान असूनही शिक्षण निरुपयोगी आहे. औषधनिर्मिती कंपन्यांचे गैरप्रकार वाढले आहेत. रुग्णालये कॉर्पोरेट झाली आहेत. ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.’

‘वंचितांचे नेतृत्व असेल, तर व्यवस्था बदलते. आरोग्यदायी समाजाची निर्मिती होणे गरजेचे आहे. मात्र, आज देशात हिंसेचे, घृणेचे राजकारण होताना दिसत आहे. डोक्यात विष पेरले जात आहे. ही परिस्थिती धुवून काढण्यासाठी तीन-चार पिढ्या लागणार आहेत, असे गुप्ते यांनी सांगितले. अनेकदा आपल्याकडे चांगल्या कामाला संस्थात्मक रूप मिळत नाही. मात्र, डॉ. अहंकारी यांनी त्यांच्या कामाला संस्थात्मक रूप दिले. या पुस्तकाचे इंग्रजी रूपांतर झाल्यास डॉ. अहंकारी यांचे काम जागतिक स्तरावर पोहोचेल. आरोग्य हा वैश्विक मुद्दा आहे. डॉ. अहंकारी यांना माणुसकीचे प्रोत्साहन होते. सोव्हिएट क्रांती झाल्यावर लेनिनने आरोग्य धोरण आणले. त्यानंतर ब्रिटनमध्ये ‘नॅशनल हेल्थ सर्व्हे’ची स्थापना झाली,’ असे केतकर यांनी सांगितले.