पुणे : वाढत्या लोकसंख्येबरोबरच भारताची ऊर्जा आवश्यकता प्रचंड वाढणार आहे. त्यात आपण कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘नेट झीरो’चे लक्ष्य ठेवले असल्यामुळे एका अर्थाने आपण कात्रीत सापडलो आहोत. अशा परिस्थितीत अणुऊर्जा हाच शाश्वत उपाय आहे, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
आघारकर संशोधन संस्थेचे संस्थापक शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘संस्थापक दिन’ कार्यक्रमात महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी या आघारकर संशोधन संस्थेच्या मातृसंस्थेचे अध्यक्ष या नात्याने डॉ. काकोडकर बोलत होते. केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले आणि आघारकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफळकर या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>>काळे फासण्याला जबाबदार कोण? पहिली प्रतिक्रिया देत नामदेव जाधव म्हणाले, “हे सर्व १०० टक्के…”
डॉ. काकोडकर म्हणाले, की अणुऊर्जेच्या निर्मितीतून तयार होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान भारताकडे आहे. मात्र, अणुऊर्जेच्या किरणोत्साराभोवती फोबिया तयार झाला असून, आजपर्यंत झालेल्या दुर्घटनेत सर्वाधिक हानी ही मनोदैहिक (सायकोमॅटिक) असल्याचे सिद्ध झाले आहे. दुर्दैवाने सर्वसामान्य नागरिकच नाही तर शास्त्रज्ञांमध्येही या चुकीच्या नकारात्मकतेची भीती आहे. सध्याच्या डिजिटल युगात अशा नकारात्मकतेचे वाढलेले वलय दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनीच पुढे येत आपले सामाजिक दायित्व ओळखावे. आर्थिक विकासाबरोबर मानवविकास निर्देशांक महत्त्वाचा आहे. देशाला सध्या समाजाभिमुख विज्ञानाची गरज असून बाजारपेठेत वर्चस्व गाजविणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. तंत्रज्ञानाला काळाच्या पुढे नेत धोरणकर्त्यांना मार्गदर्शन करताना संशोधकांनी तंत्रज्ञानाचा समाजावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करावा. ‘बायोटेक्नॉलॉजी रिसर्च इनोव्हेशन कौन्सिल’ आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाच्या सद्य:स्थितीबद्दल डॉ. गोखले यांनी आपल्या भाषणात प्रकाश टाकला. हिंदी भाषेतील ‘संस्कृती’ या त्रमासिकाचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच २५ वर्षांच्या सेवेबद्दल कर्मचारी व्ही. एम. खाडे यांचा सन्मान करण्यात आला.