‘चित्रपट करणे ही माझ्यासाठी एक समाजसेवाच आहे. राज, राहुल, प्रेम यांमध्ये अडकलेल्या विषयांच्या पलिकडे जाऊन ‘पिस्तुल्या’ आणि ‘जब्या’च्या माध्यमातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे,’ असे ‘फँड्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्माना’ला उत्तर देताना रविवारी सांगितले.
अनिता अवचट फाउंडेशनच्यावतीने डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि दुर्धर आजाराशी झुंज देत असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेला ‘डॉ.अनिता अवचट संघर्ष सन्मान’ देण्यात येतो. यावर्षी पिस्तुल्या, फँड्री या चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ या संस्थेला पुरस्कार देण्यात आला. या वेळी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कार्यकारी संचालक विवेक सावंत, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आदी उपस्थित होते.
या वेळी मंजुळे म्हणाले, ‘‘पिस्तुल्या आणि फँड्री हे आपल्या समाजातील वास्तव आहे, त्यामुळे मी त्याचा आनंद घेऊ शकत नाही. माझ्या चित्रपटांना आणि मला प्रसिद्धी मिळल्यानंतर माझी जात लक्षात घेऊन मला अनेक कार्यक्रमांची निमंत्रणे आली. मात्र, माझी जात गृहीत धरू नका. माझ्याकडे माणूस म्हणून पाहा.’’
या वेळी सावंत म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांची कृतीच त्यांना असामान्य ठरवत असते. त्याचेच उदाहरण नागराज मंजुळे आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ या संस्थेच्या रूपाने आपल्याला मिळाले आहे. त्यांच्या कामापासून बाकीच्यांनाही प्रेरणा मिळेल.’’
चित्रपट करणे ही माझ्यासाठी समाजसेवा – नागराज मंजुळे
‘पिस्तुल्या’ आणि ‘जब्या’च्या माध्यमातून वास्तव मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे,’ असे ‘फँड्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्माना’ला उत्तर देताना रविवारी सांगितले.
First published on: 10-02-2014 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr anita avachat award to nagraj manjule