पुणे : पुण्यात डिसेंबरमध्ये होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांची एक मताने निवड करण्यात आली आहे. १० आणि ११ डिसेंबरला हे संमेलन होत आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असताना वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करून नवा समृद्ध पर्यावरण संतुलित समाज निर्माण करू पाहणाऱ्या विचाराकडे डॉ. पाटणकर आकृष्ट झाले. प्रस्थापित ब्राह्मण्यवादी, भांडवली पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध विद्रोही सांस्कृतिक चळवळीत ते कार्यरत आहेत. समाजातील विविध वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. पाटणकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. ते कवीही आहेत. कविता झेपावणाऱ्या पंखाची या कविता संग्रहासह विविध २४ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांतून त्यांनी आपले प्रबंध सादर केले आहेत. त्यांना बाबुराव बागुल गौरव पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, अरुण लिमये स्मृती युवा पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे पर्यायी सांस्कृतिक क्षेत्रात एक भूमिका घेऊन काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्यांचा तसेच चळवळीचा सन्मान झाला आहे असे पुणे येथे होणाऱ्या १४ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीला वाटते. जातीव्यवस्थेला विरोध करत, कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली आहे. कॉ. शरद पाटील यांच्या पुढाकाराने उभ्या राहिलेल्या दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य सभेच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग आहे. या चळवळीच्या वतीने अनेक दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वी करण्यात आली आहेत.