हर्षद राजपाठक

पुण्यात संगीत विद्यालये, कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांचा सुकाळ आहे. परंतु, समग्र प्रयोगकलांची अभ्याससामग्री जतन करणारे, संशोधकांना ही सामग्री उपलब्ध करून देणारे एकमेव ‘संग्रहकेंद्र’ (अर्काइव्ह) पुण्यात आहे, ते म्हणजे ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड कल्चर’ (संक्षेपाने अॅड्रा)! महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या हिराबागेतील वास्तूत असलेले रानडे अर्काइव्हज देश विदेशातील प्रयोगकलांच्या अभ्यासकांत एक महत्त्वाचे स्राोतकेंद्र म्हणून ओळखले जाते. भारतात संगीत, नृत्य, नाट्य ह्या प्रयोगकलांची हजारो वर्षांची परंपरा प्रामुख्याने ‘मौखिक’ स्वरूपात जतन झाली आहे. मात्र, आधुनिक काळात ह्या कलांविषयी ध्वनिमुद्रण, छापील ग्रंथ अशा माध्यमांतून प्रचंड सामग्री निर्माण झाली. प्रयोगकलांचा अभ्यास, संशोधन आणि प्रस्तुती ह्या तिन्ही अंगांसाठी ह्या सामग्रीचे अत्यंत महत्त्व आहे. कलाशिक्षणाची भिस्त जरी आजही मुख्यत्वे गुरू-शिष्य परंपरेवरच असली तरी आजच्या वेगाने बदलत्या काळात प्रयोगकलांच्या ज्ञानाचा संग्रह करणे, तो सुरक्षित राखून पुढच्या पिढीकडे देणे ही काळाची गरज आहे. ह्याच दृष्टीने ‘डॉ. अशोक दा. रानडे प्रयोगकला संस्कृती संग्रहकेंद्र’ कार्यरत आहे.

ज्येष्ठ गायक, गुरू आणि संस्कृती-संगीतशास्त्राचे अध्वर्यु डॉ. अशोक दा. रानडे यांनी अनेक दशके समग्र संस्कृतीच्या संदर्भात प्रयोगकलांचा विचार, संशोधन आणि लेखन केले. भारतात संस्कृती संगीतशास्त्र (इथ्नोम्यूझिकलॉजी वा कल्चरल म्यूझिकलॉजी) ह्या अभ्यासशाखेत काम करणाऱ्या मोजक्या तज्ज्ञांपैकी डॉ. रानडे हे एक होते. विशिष्ट समूहाचे संगीत तपासताना त्यांच्या चालीरीती, लौकिक जीवनाचे आयाम, भाषा, वांशिक आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, खाद्या, व्यवसाय, धर्म, सणवार अशी कित्येक अंगे अभ्यासावी लागतात. डॉ. रानडे यांनी अनेक दशके अशी मौल्यवान अभ्याससामग्री गोळा केली होती. डॉ. रानड्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी हेमांगिनी रानडे यांनी ‘हा संग्रह पुढल्या पिढीतील अभ्यासकांना उपलब्ध असावा, त्यातून अभ्यास व संशोधन चालू राहावे’ अशी इच्छा व्यक्त करून ही सामग्री महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडे सुपूर्द केली. डॉ. रानड्यांचे शिष्य असलेले संशोधक संगीतकार डॉ. केशवचैतन्य कुंटे यांच्या पुढाकाराने हे संग्रहकेंद्र स्थापन झाले. २०१४ साली ज्येष्ठ गायिका शुभा मुद्गल ह्यांच्या हस्ते अॅड्राचे उद्घाटन झाले. हा सर्व संग्रह अॅड्राच्या रूपाने पुण्यात उभा राहिला त्याला आता १० वर्षे पूर्ण होत आहेत. देश विदेशातले बरेच अभ्यासक, कलाकार, विद्यार्थी व रसिक या संग्रहाचा लाभ घेत आहेत.

हेही वाचा : वर्धापनदिन विशेष: ध्यासमग्न उद्योगपती : रवी पंडित

अॅड्रामध्ये डॉ. रानडे यांच्या लेखनाबरोबरच विविध कोश, तसेच संगीत, नृत्य, नाट्य, लोककला व लोकसंस्कृती, इतिहास, भाषा, साहित्य इत्यादी विषयांवरचे ३००० हून अधिक ग्रंथ, नियतकालिके, कात्रणांच्या २५०हून अधिक फाइल्स आहेत. जगभरातील नानाविध प्रांतांच्या ध्वनिमुद्रित संगीताचा मोठा साठा आहे. चरित्रे, आत्मचरित्रपर लिखाण, संगीताचा इतिहास, आवाजसाधनाशास्त्र, प्रादेशिक संस्कृती आणि संगीत, नृत्य, नाट्य परंपरा, इतिहास, दैवतशास्त्र, संकेतचिन्हशास्त्र, धर्म आणि तत्त्वज्ञान, वाङ्मय, समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र, ध्वनिसिद्धांत, इ. विषयांवरील दस्तऐवजाचे वर्गीकरण करून त्यांना टॅग आणि अनुक्रम दिलेला आहे. बव्हंशी ग्रंथालयांत मुद्रित सामग्री असते, तर म्युझिक अर्काइव्हजमध्ये केवळ दृक्श्राव्य संग्रह असतो. अॅड्राचे वैशिष्ट्य असे की, ह्या दोन्ही प्रकारची सामग्री इथे आहे. शिवाय त्यावर योग्य ते नियोजनसंस्कार केल्याने त्याला मोठे संदर्भमूल्यही आहे. १८३८ साली प्रकाशित झालेल्या भारतीय भाषेतल्या संगीतविषयक पहिल्या पुस्तकापासून काही कलावंतांच्या व्यक्तिगत अनेक प्रकारचे दुर्मिळ संदर्भसाहित्य इथे आहे. वस्ताद मुरारबा गोवेकर यांचे १८९३ साली प्रसिद्ध झालेले ह्यसतारीचे पुस्तकह्ण, सदाशिव ठोसरांचे ‘नाट्यकला रुककुठार’, डॉ. माधव पु. जोशी यांचे वाचाउपचारावरचे आद्या पुस्तक ‘वाग्विज्ञान’ अशी दुर्मिळ पुस्तकांची यादी खूप मोठी आहे! मराठीखेरीज बंगाली, हिंदी, उर्दू, गुजराती, इंग्लिश, इ. भाषांतील सामग्री इथे आहे. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर परदेशातील अभ्यासकही अॅड्राला मुद्दाम भेट देऊन हवी ती माहिती नोंदवून घेत असतात.

संस्थापक-संचालक डॉ. केशवचैतन्य कुंटे आणि अधीक्षक (क्युरेटर) श्रुति कुंटे हे दाम्पत्य निरलसपणे, योगक्षेमाच्या भावनेतून कोणत्याही आर्थिक मोबदल्याविना गेले एक तप ह्या संग्रहकेंद्राचे कार्य करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांनी, आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या पाठिंब्यामुळे प्रयोगकलांचा हा ठेवा नेटकेपणाने जतन झाला आहे. डॉ. रानडे यांच्या सामग्रीशिवाय सरदार आबासाहेब मुजुमदार, मालिनी राजुरकर, सुनीता खाडिलकर, वीणापाणी शुक्ल, अमेरिकेतील डॉ. बळवंत दीक्षित अशा अनेकांनी सुपूर्द केलेल्या सामग्रीने हे संग्रहकेंद्र अधिकच समृद्ध होत चालले आहे. अधीक्षक श्रुति कुंटे ह्या वर्षा जोगळेकर, माधवी चक्रदेव अशा सहकाऱ्यांच्या आणि काही प्रशिक्षणार्थींच्या साहाय्याने सामग्रीची विषयवार वर्गवारी करणे, दुर्मिळ वा नाजूक अवस्थेतल्या सामग्रीचे जतनीकरण व अंकरूपण (डिजिटायझेशन) करणे, सूक्ष्मविदा (मेटाडेटा) नमूद करणे अशा अनेक पातळ्यांवर अॅड्रात काम करतात. त्यामुळे ही माहिती बोटाच्या केवळ एका क्लिकवर कळू शकते. कुणाला विशिष्ट विषयाचा अभ्यास करायचा असेल तर, उदा. एखाद्याने ह्यआग्रा घराणेह्ण किंवा ‘बंगाली रंगभूमी’ अशा प्रकारची विचारणा केली तर संबंधित पुस्तके, लेख, कात्रणे, दृक्श्राव्य साहित्य अशी सगळी अभ्याससाधने कळू शकतात आणि ती उपलब्ध होऊ शकतात.

हेही वाचा : वर्धापनदिन विशेष : विद्यापीठांचे पुणे

नुसता संग्रह करण्यावर अॅड्राचा भर नसून, ह्या कलाविषयक सामग्रीचा प्रत्यक्ष कलाप्रस्तुतीसाठी उपयोग कसा करून घेता येईल, याकडेही लक्ष दिले जाते. कलाकार, विद्यार्थी, रसिक यांची कलेची दृष्टी व्यापक कशी करता येईल आणि हा ऐतिहासिक ठेवा आधुनिक काळाशी कसा सुसंगत करून जोडता येईल, हेही पाहिले जाते. ह्याच अनुषंगाने अॅड्रामधील सामग्रीचा उपयोग करून कलाकारांनी दुर्मिळ, काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलाकृती प्रकाशात आणाव्या अथवा नवनिर्मित कलाकृती पेश कराव्या, यासाठी डॉ. केशवचैतन्य कुंटे यांनी ‘परफॉर्मंस फ्रॉम अर्काव्हज’ ही कार्यक्रम-मालिका सुरू केली. त्या अंतर्गत प्रमोद काळे (‘नाटक उभे राहताना’ – नाट्यलेखनापासून प्रयोगापर्यंतची प्रक्रिया स्पष्ट करणे विविध नाट्यकर्मींचे अनुभवकथन), डॉ. पौर्णिमा धुमाळे (‘रशर्शे ठुमरी’ – दुर्मिळ ठुमरी-दादरे), स्वप्ना दातार (‘पूर्वशतकाचे सूर’ – वाद्यासंगीताच्या रचना), शर्वरी जमेनीस (‘नृत्यगान’ – कथक नृत्याच्या अनवट रचना), वंदना बोकील कुलकर्णी (‘बहुरूपधारिणी’ – मराठी भाषेच्या वापराचे वैशिष्ट्यपूर्ण नमुने) यांनी नवीन कलाकृती पेश केल्या. ‘महाराष्ट्र स्त्रीगीत’ हे शतकापूर्वी संगीतशास्त्री कृष्णराव मुळे यांनी संग्रहित केलेल्या मराठी स्त्रीगीतांचे सादरीकरण, ‘गीतसंचित’ हा डॉ. रानडे यांच्या अप्रतिम मराठी स्वररचनांचा कार्यक्रम, ‘इति द. ग. गोडसे’ ही चित्रकार द. ग. गोडसे यांच्या सारगर्भ लेखनाची दृक्श्राव्य प्रस्तुती असे ह्या कार्यक्रम-मालिकेतील आविष्कार वेधक, अभ्यासपूर्ण आहेत.

अॅड्रामध्ये कार्यशाळा, सप्रयोग व्याख्याने देखील होतात. संगीताचे मर्म समजून घेण्यासाठी दर बुधवारी ‘प्रणीत श्रवणसत्र’ (गायडेड लिसनिंग सेशन्स) होतात, त्यांचाही लाभ संगीताचे अनेक विद्यार्थी आणि रसिक घेतात. केवळ हिंदुस्थानी रागसंगीतच नव्हे तर लोकसंगीत, जनसंगीत, धर्मसंगीत आणि जगभरातील अनेक संगीतपरंपरांतील आविष्कार डॉ. केशवचैतन्य कुंटे त्यांच्या मार्मिक विवेचनासह ऐकवतात. त्यामुळे या कार्यक्रमांमधून नेहमीच कलेचा एक समृद्ध, समग्र असा अनुभव सर्वांना मिळतो. आजच्या इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या युगात अशा संग्रहकेंद्रांत प्रत्यक्ष हजर होऊन अभ्यास करणारे लोक कमी असतात. शिवाय जगभर विखुरलेल्या अभ्यासकांना ही सामग्री कशी उपलब्ध होणार? याचसाठी अॅड्रा ह्या सामग्रीचे डिजिटायझेशन करून ती आंतरजालावरही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ध्वनिमुद्रणे प्रकाशित केली जात आहेत. डॉ. रानडे यांच्या लेखांचे अभिवाचन यूट्यूबवर ‘कानमंत्र’ या मालिकेतून प्रसारित केले जाते. फेसबुक पेजवर वर्षा जोगळेकर यांनी एकेक संकल्पना घेऊन (उदा. संगीताची तालीम, सादरीकरणासाठीची देहबोली, भारतातली प्राचीन विद्यापीठे, रंगभूमीवरील प्रकाशयोजना, .) अॅड्रामधील लेख, छायाचित्रे संकलित रूपाने रोचक रीतीने सादर केली आहेत. शिवाय पुस्तके, नियतकालिके, बाडे, छायाचित्रे, इ. साहित्य वेबसाईटवरून सर्वांना उपलब्ध करण्याचे काम चालू आहे.

हेही वाचा : वर्धापनदिन विशेष : वाहन निर्मितीतील नावीन्याचा ध्यास

विशिष्ट कलाप्रकार वा कलावंत यांचे दस्तऐवजीकरण करून दिग्गज कलावंत आणि त्यांच्या रचना अर्काइव्हच्या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करणे, तसेच संगीतशास्त्र, संस्कृतीसंगीतशास्त्र आणि संगीतसंग्रहशास्त्र (म्यूझिक अर्कायव्हिंग) या विषयांवर कार्यशाळा व अभ्यासक्रम घेणे असे उपक्रम भविष्यात संकल्पित आहेत. गेल्या शतकात भातखंडे, पलुसकर अशा विभूतींनी संगीतविद्योला खासगी क्षेत्रातून सार्वजनिक क्षेत्रात आणले, अनेक प्रयोगकलाकर्मींच्या प्रयत्नांनी कलाविषयक ज्ञानाची कवाडे खुली झाली. ह्याच अंतरदृष्टीने आता २१व्या शतकात, डिजिटल युगात ‘डॉ. अशोक दा. रानडे प्रयोगकला संस्कृती संग्रहकेंद्र’ हे परंपरेचे जतन, संवर्धन आणि वहन ह्या त्रिसूत्रीने प्रयोगकला क्षेत्रात कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.