लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारितील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनतर्फे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची स्थापना करण्यात आली. हे देशातील २५ वे अध्यासन असून, त्यासाठी दरवर्षी ७५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वसमावेशकतेवर प्रभाव टाकणारे विचार आणि योजनेच्या इतर उद्दिष्टांवर अभ्यास करण्यात येईल.
अध्यासनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन आणि सिम्बायोसिस विद्यापीठात सामंजस्य करार करण्यात आला. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. आंबेडकर फाउंडेशने संचालक विकास त्रिवेदी, युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, श्री सुधीर हिलसायन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. मुजुमदार म्हणाले, की या सामंजस्य कराराच्या माध्यमातून नवीन संधी उपलब्ध झाली आहे. समाजातील दुर्बल घटकांच्या समकालीन समस्या आणि त्यावरील उपाययोजनांसाठीचे संशोधन केले जाईल. समाजातील वंचित घटकांच्या वर्तमान आणि भूतकाळातीळ समस्यांवर अत्याधुनिक सामाजिक संशोधन आणि अध्यापन करण्यात येईल. तसेच समाजतील वंचित घटकांना न्याय देणे, त्यांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्रिवेदी यांनी नमूद केले.