पुणे : भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी देशातील पहिली भीमथॉन स्पर्धा पुणे शहरातून सुरू होणार आहे. डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देण्यासाठी आयोजित ही स्पर्धा मॅरेथॉनच्या धर्तीवर आधारित आहे.

सारसबागेजवळील सणस मैदान येथून १४ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरू होणाऱ्या भीमथॉनचा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप होणार आहे. महिला, पुरुष आणि १८ वर्षांखालील युवक अशा गटांतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भीमथॉनमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना समाजातील जातीय, धार्मिक बंधुभाव जपून सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देण्यासाठी भीमथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान जनजागृती, ऐक्याचा संदेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी मांडलेले विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी भीमथॉनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत आणि किशोर कांब‌ळे यांनी सोमवारी दिली. या स्पर्धेमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्था आणि गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.