पिंपरी- चिंचवड: राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. धांगडधिंगा न घालता १८ तास अभ्यास करून दापोडीतील तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. संविधान बदलणार ही अफवा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथविधी घेताना संविधानाला अभिवादन केले. संविधान बदलणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. असं म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे. अण्णा बनसोडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पिंपरी- चिंचवडच्या दापोडी मध्ये अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी सलग अठरा तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल आहे. कुठलाही धांगडधिंगा न घालता आणि डीजे विरहित जयंती साजरी करावी अस आवाहन युवकांनी केल आहे.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. डॉ. बाबासाहेब यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कोलंबिया येथे शिक्षण घेतलं. सलग अठरा- अठरा तास अभ्यास करून त्यांनी पदवी प्राप्त केली. पुढे ते म्हणाले, दापोडीतील हा उपक्रम गेल्या १९ वर्षापासून आम्ही राबवत आहोत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी संविधान बदलणार असल्याच्या चर्चा आणि अफवा उठवल्या होत्या. परंतु, या अफवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देत शपथविधीच्या वेळी संविधानाला अभिवादन केलं होतं. संविधान बदलणार या चर्चेला पूर्णविराम दिला होता. असं विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले.