डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे हल्लेखोर दिसत असलेले सीसीटीव्ही चित्रीकरण अस्पष्ट असल्यामुळे ते स्पष्ट करण्यासाठी लंडन येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी दिली.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला नऊ दिवस उलटले असून पोलीस विविध शक्यतांवर तपास करत आहेत. या तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांची २३ पथके काम करत आहेत. काही पथके विविध शहरात जाऊन तपास करत आहेत, तर काही पथके सीसीटीव्ही आणि मोबाईलचा डमडेटा तपासण्याचे काम करत आहेत. पोलिसांनी शहरातील ११० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवले आहे. त्यामधील आतापर्यंत ८० ठिकाणचे चित्रीकरण पहाण्याचे काम झाले आहे. शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण गोळा केले असून त्यामध्ये आरोपी दिसतात का हे पाहण्याचे काम सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर हल्ला करण्याअगोदर  येताना आणि जाताना आरोपी सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहेत. पण, हे चित्रीकरण अस्पष्ट दिसत असल्यामुळे हल्लेखोरांचे चेहरे पाहण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे चित्रीकरण स्पष्ट करण्यासाठी लंडन येथील एका प्रयोगशाळेत पाठविले आहे. या ठिकाणी हे चित्रीकरण स्पष्ट झाल्यानंतर आरोपींचे चेहरे दिसणार आहेत. डॉ. दाभोलकर यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी अनेकजण त्या ठिकाणी होते. पण, माहिती देण्यासाठी फक्त दोनच व्यक्ती पुढे आल्या आहेत. इतरही नागरिकांनी माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सोळुंके यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा