डॉ. गो. बं. देगलूरकर यांची भावना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 पुणे : लोकांना एकत्र आणणाऱ्या वारीमध्ये अभंगांच्या माध्यमातून संतांनी ज्ञान आणि प्रबोधनाचे कार्य करीत समाजजागृती केली. आपल्या संस्कृतीमध्ये काही गोष्टी इतक्या दृढमूल आहेत, की त्यामध्ये बदल होणार नाही. वारीचा गाभा अखंड आहे. गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा आणि मुखाने हरिपाठ म्हणणारा वारकरी इकडं-तिकडं जाणारच नाही. अक्षय सामथ्र्य असलेल्या वारीचा ‘इव्हेंट’ होणार नाही आणि वारकऱ्यांच्या शक्तीला क्षती पोहोचणार नाही, अशी भावना मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सोमवारी व्यक्त केली.

‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित आणि ‘ग्रॅव्हिट्स फाउंडेशन’ प्रायोजित ‘विठ्ठलवारी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत आणि गॅ्रव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे या वेळी उपस्थित होत्या. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविकामध्ये ‘विठ्ठलवारी’ पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका स्पष्ट केली.

देगलूरकर म्हणाले, आपल्याकडे वारीला न जाता देखील अनेक जण वारीबद्दल बोलत असतात. वारीची म्हणून एक शिस्त असते. दिंडीमधून चालत असताना कोणालाही हरिनाम उच्चारण्याखेरीज अन्य काही बोलता येत नाही. बोलायचे असेल तर िदडीतून बाहेर यावे लागते. वारकरी भजनं ऐकल्यानंतर ते किती ताला-सुरात गातात याची प्रचिती येते. चांगल्या गायकांनाही जमत नाही. पण, अनेक वारकरी काळी चारमध्ये टिपेचा स्वर लावतात. भारुडातून मनोरंजन आणि प्रवचन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेळ्या-मेंढय़ांमधून वाघ निर्माण केले हे वारीचे सामथ्र्य आहे. ‘हरी मुखे म्हणा’ असे म्हणत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची ‘देव पाहाया गेलो देवचि होऊन गेलो,’ अशी अवस्था होते.

कामत म्हणाले, वारी म्हणजे केवळ अध्यात्म नाही. ती सश्रद्ध मंडळींची यात्राही नाही. तर, वारी ही अखंड चालणारी भक्तिपरंपरा आहे. हिंदूवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज या एकमेव राजाला वारीपासून प्रेरणा मिळाली. ज्ञानवंत आणि सुधारकांची परंपरा निर्माण झाली. ‘एकच ग्रंथ, एकच पंथ आणि एकच संत’ असे म्हणण्यापेक्षा आपला वैविध्यपूर्ण सांस्कृतिक इतिहास उलगडण्याची ताकद संत परंपरेमध्ये आहे. ‘विठ्ठलवारी’ हे भक्तिसंप्रदायाच्या चळवळीचे कॉफी टेबल बुक आहे. देशाच्या अन्य प्रांतामध्ये संत, संप्रदाय आणि भक्तिग्रंथ आहेत. पण, शिस्तीचे व्यवस्थापन असलेली वारीची प्रथा जगात कोठेही नाही. लोकांनी, लोकांसाठी चालविलेले समाजजागरण होऊ शकणारे महत्त्वपूर्ण साधन आहे.

सतत पुढे चालत राहणं हे मी वारकऱ्यांकडून शिकले, असे सांगून उषा काकडे म्हणाल्या, एकमेकांचा आदर करून एकमेकांना आधार देण्याचे काम, ही वारकऱ्यांची शिकवण आहे. गेल्या १८ वर्षांपासून पालखीच्या मुक्कामी मी वारकऱ्यांची सेवा करत आहे. अभिजित बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले.

विठ्ठल मूर्तीमध्ये ज्ञान आणि पावित्र्याचा संगम

विठ्ठलमूर्तीचे वैशिष्टय़ उलगडताना डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणाले, ऐहिक संपन्नता असलेली बालाजीची मूर्ती भोगस्थानक आहे. मारुती आणि महिषासुरमर्दिनी या वीरस्थानक मूर्ती आहेत. ‘समरचण वीटेवर उभी’ असलेली पांडुरंगाची मूर्ती योगस्थानक आहे. मूर्तीच्या एका हातामध्ये ज्ञानाचे प्रतीक असलेला शंख तर दुसऱ्या हातामध्ये पावित्र्याचे प्रतीक असलेले पद्म म्हणजे कमळाचे फूल आहे. ज्ञान आणि पावित्र्य हे योग्याचे लक्षण आहे.