लंडन येथील फेलो ऑफ रॉयल सोसायटीच्या ३६० वर्षांच्या इतिहासात हा बहुमान प्राप्त पहिल्या भारतीय महिला व वेल्लोर येथील ख्रिश्चियन वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग आणि संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या माध्यमातून क्षेपणास्त्र विकसनामध्ये बहुमोल योगदान देणाऱ्या एरोनॅटिकल सिस्टिम्सच्या महासंचालक शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस या यंदाच्या ’एच. के. फिरोदिया ॲवॉर्ड’च्या मानकरी ठरल्या आहेत. पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने बायोकॉन ग्रुपच्या संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. किरण मुजुमदार शॉ यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> पुणे : नियमावलीचा अवलंब केल्यास शून्य कार्बन उत्सर्जन शक्य
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षी एच. के. फिरोदिया ॲवॉर्डने गौरविण्यात येते. बालगंधर्व रंगमंदिर येथे २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. किरण मुजुमदार शॉ यांच्या हस्ते डॉ. गगनदीप कांग यांना एच. के. फिरोदिया विज्ञान रत्न ॲवॉर्ड , तर डॉ. टेसी थॉमस यांना एच. के. फिरोदिया विज्ञान भूषण ॲवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. ‘इनोव्हेटिंग फॉर ग्लोबल कॉम्पिटिशन’ ही यंदाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे, अशी माहिती कायनॅटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ व वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा >>> पुणे : दोन वर्षांनंतर वाजत-गाजत होणार गणरायाचे आगमन; मानाच्या गणपतींची मुहूर्तावर होणार विधिवत प्राणप्रतिष्ठापना
प्रथमच तीन महिला व्यासपीठावर
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशातून २४ वर्षांपूर्वी एच. के. फिरोदिया ॲवॉर्ड सुरू करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना पुरस्कार प्रदान करून एच. के. फिरोदिया ॲवॉर्डचा श्रीगणेशा झाला होता. या पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष आणि डॉ. किरण मुजुमदार शॉ, डॉ. गगनदीप कांग व डॉ. टेसी थॉमस अशा तीन कर्तृत्ववान महिला प्रथमच व्यासपीठावर असा अनोखा योग यानिमित्ताने जुळून आला आहे, असे डॉ. रघुमाथ माशेलकर यांनी सांगितले.