पुणे : ‘चळवळीमध्ये काम करताना ज्याला आपण विरोध करत आहोत त्याच्यासारखेच आपण होत नाही ना, हे तपासून घेतले पाहिजे. आपणही तसेच होत असू, तर हे मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे,’ असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘यंत्रणा उभी करण्यात आलेले अपयश ही चळवळीपुढील समस्या आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचे समज हे मूलतत्त्ववादी विचारांप्रमाणे असतात का, याचाही विचार झाला पाहिजे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या वतीने आयोजित ‘सावित्री जोतिबा समता उत्सवा’मध्ये ‘ए बिस्मिल्लाह’ हा एकपात्री प्रयोग रसिका आगाशे यांनी सादर केला. त्यानंतर झालेल्या चर्चासत्रात डॉ. हमीद दाभोलकर, या नाटकाच्या लेखिका हिना कौसर खान, रसिका आगाशे आणि जमीर कांबळे यांच्याशी गीताली वि. मं. यांनी संवाद साधला. त्याप्रसंगी दाभोलकर बोलत होते. कार्यक्रमात ‘मिळून साऱ्याजणी’च्या एप्रिल २०२५ विशेषांकाचे प्रकाशन तसेच रेऊ कथा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

आगाशे म्हणाल्या, ही आमची गोष्ट पाहतोय, अशी मुस्लिम महिलांची प्रतिक्रिया येते, तेव्हा वास्तववादी नाटक केल्याचे समाधान मानायचे का, असा प्रश्न पडतो. सामान्य मुस्लिम महिला नाटकात नायिका म्हणून आलीच नाही, याकडे त्या लक्ष वेधतात.’

हिना खान म्हणाल्या, ‘आपल्याच धर्मातून आणि बाहेरच्या धर्मातून असे मुस्लिम स्त्रीच्या प्रश्नांचे स्वरूप दुहेरीपणे टोकदार होत आहे. धर्मात सुधारणा होईल तेव्हा मुस्लिम महिला मुक्त होईल हा निव्वळ गैरसमज आहे.’

कांबळे म्हणाले, ‘चळवळीतील महिलांनी बाई या नावाला कधी प्रश्न उपस्थित केला नाही. लिंगभाव हे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक स्वरूपाचे रचित नाटक असते. मी शोषितेच्या भूमिकेत राहणार नाही, असा निश्चय महिलेने केला पाहिजे.’

नेहमी बायकांच्याच अंगात का येते? एरवी मारणारा नवरा आणि सासू अंगात आल्यानंतर तिच्या पाया पडतात. म्हणून अंगात येणे ही व्यक्त होण्यासाठी तिने शोधलेली वाट असावी. सहचारिणीचे यश निखळपणे स्वीकारण्याची मानसिकता रुळली नसल्याने समाजामध्ये पुरुषांचीही कुचंबणा होत आहे. – डाॅ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ