पुणे : ‘पाली भाषेला प्रदीर्घ इतिहास लाभला असून, ती सर्वसामान्यांची भाषा होती. तथागत गौतम बुद्धांनीदेखील पाली भाषेतूनच धम्मोपदेश दिले आहेत. भारत, श्रीलंका आणि पूर्वेकडील देशात पाली भाषा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे. या भाषेतील विपुल साहित्याचा अनुवाद होणे आवश्यक असून, पाली भाषेच्या संवर्धन आणि प्रचारासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत,’ असे मत अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि कोलकाता विद्यापीठाच्या पाली विभागाचे प्रमुख डॉ. उज्ज्वल कुमार यांनी शनिवारी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पद्मपाणि फाउंडेशन संचालित अभिजात पाली भाषा संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनात डॉ. कुमार बोलत होते.भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन जर्मनी येथील प्रसिद्ध भाषा तज्ज्ञ डॉ. जेम्स वू हार्टमन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सुनील वारे, पद्मपाणी फाउंडेशनचे राहुल डंबाळे, स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रतिमा प्रकाशनाचे डॉ. दीपक चांदणे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, लातूर येथील राजर्षी शाहू कॉलेजच्या पाली विभागाचे डॉ. भिमराव पाटील, सुवर्णा डंबाळे आदी उपस्थित होते. तसेच या संमेलनात भारतासह म्यानमार, श्रीलंका, व्हीएतनाम, जर्मनी, स्वित्झर्लंड, साऊथ कोरिया, थायलंड या आठ देशातील पाली भाषेतील अभ्यासक-संशोधक सहभागी झाले होते.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागाच्या डॉ. दीपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

पाली भाषेला धम्माचे अधिष्ठान

‘पाली भाषेला धम्माचे अधिष्ठान प्राप्त असून, इथल्या राजकीय चळवळींचा तो कणा आहे. देशाच्या बहुसंख्य भागात पाली भाषेच्या खुणा आढळतात. केंद्र सरकारने मराठीसह पाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मात्र, त्याचा उत्सव साजरा केला जात नाही,’ अशी खंत गौतम चाबुकस्वार यांनी या संमेलनात व्यक्त केली.

जर्मनीतही पाली साहित्य प्रकाशित

‘पाली भाषा ही अत्यंत प्राचीन भाषा आहे. या भाषेत मोलाचे ज्ञान उपलब्ध असून, अभिजात कला आणि साहित्याची निर्मिती पालीतून झाली आहे. या अमूल्य ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जगभरात व्हायला हवा. पाली सोसायटी स्थापन करून जर्मनीतही पालीतील साहित्य प्रकाशित करण्यात येत आहे,’ असे भाषातज्ज्ञ डॉ. हार्टमन यांनी सांगितले.