पुणे : ‘अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या कर युद्धाचे पडसाद जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटत आहेत. मात्र, त्याचा भारतावर थेट परिणाम होणार नाही,’ असे मत ‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी’चे अध्यक्ष आणि चीनविषयक अभ्यासक डॉ. जयदेव रानडे यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘भारत-चीन संबंध नजीकच्या काळात सुधारण्याची शक्यता नसून, चीनला केवळ भारताची बाजारपेठ बळकावायची आहे,’ असेही रानडे यांनी स्पष्ट केले.
‘सेंटर फॉर चायना ॲनालिसिस अँड स्ट्रॅटेजी’, ‘सेंटर फॉर ॲडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामरिक शास्त्र विभागातर्फे आयोजित ‘राईज ऑफ चायना अँड इट्स इंप्लिकेशन फॉर द वर्ल्ड’ या परिषदेत डॉ. रानडे बोलत होते. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे आदी या वेळी उपस्थित होते.
रानडे म्हणाले,‘अमेरिका चीनमधील कर युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर गंभीर परिणाम होत आहेत. जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत येणाऱ्या मंदीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही काही प्रमाणात होईल.’
‘कर युद्धामुळे चीनला नव्या पर्यांयाचा विचार करावा लागतो आहे. नव्या बाजारपेठांचा शोध चीनकडून घेण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे भारत-चीन संबंधांवर फारसा परिणाम होणार नाही. चीनचे भारतविरोधी धोरणही त्याने बदलणार नाही. चीनला भारताबरोबरचे प्रश्न सोडवण्यात कोणतेही स्वारस्य नाही. त्यांना केवळ भारताची बाजरपेठ बळकावण्याची इच्छा आहे,’ असे रानडे यांनी सांगितले.
‘चीन समस्येवर सर्वसमावेशक धोरण हवे’
‘चीनची समस्या केवळ सीमाप्रश्न किंवा बाजारपेठेइतकी मर्यादित नाही. जागतिक पातळीवर चीनचा उदय संरक्षण, राजकारण-अर्थकारण अशा सगळ्याच क्षेत्रांत होत आहे. चीनचा प्रभाव भारताच्या संरक्षण, ऊर्जा, व्यापार, उद्योगांसह प्रत्येक क्षेत्रांवर परिणाम करीत आहे. चीनच्या समस्येवर सर्वसमावेशक धोरण हवे,’ असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
परिषदेतून मांडण्यात आलेले ‘चीन’चे धोके
- जागतिक पातळीवर चीनचा वाढता प्रभाव
- सुरक्षेसह राजकारण, अर्थकारणातही आव्हान
- बेल्ट अँड रोड प्रकल्प, ब्रह्मपुत्रेवरील बांध भारतासाठी धोक्याची घंटा
- नव्या भू-राजकीय समीकरणांची मांडणी