जैन तत्त्वज्ञानामध्ये जीवन चांगले कसे जगावे हे जसे सांगितले आहे. त्याबरोबरच संथारा व्रत म्हणजेच मृत्यूला धीरोदात्तपणे कसे सामोरे जावे याचे शास्त्रोक्त विवेचन केले आहे. संथारा व्रत ही आत्महत्या आहे, असा निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. मात्र, हे व्रत म्हणजे आत्महत्या नाही तर धर्माचरण असल्याने न्यायालयाने त्यावर घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.
संथारा व्रत ही आत्महत्या आहे, असा निकाल देऊन राजस्थान उच्च न्यायालयाने हे व्रत घेणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे जैन समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. भारताच्या घटनेतील कलम २५, २९ आणि ३० अनुसार प्रत्येक भारतीयाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाच्या निकालामुळे त्याचे उल्लंघन झाले असल्याचे गंगवाल यांनी निदर्शनास आणून दिले. न्यायालयाच्या या निकालाविरोधात जैन धर्मातर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पितामह भीष्म यांनी शरशय्येवर हेच व्रत घेऊन देहत्याग केला होता. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. विनोबा भावे यांनी प्रायोपवेशन व्रत धारण करून देहत्याग केला. आत्मविश्वास गमावलेला भेकड माणूस आत्महत्या करतो. तर, संथारा व्रत धारण करणारा धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा जातो, असेही डॉ. गंगवाल यांनी सांगितले.
संथारा व्रतावरील बंदी उठवावी – डॉ. कल्याण गंगवाल
संथारा व्रत म्हणजे आत्महत्या नाही तर धर्माचरण असल्याने न्यायालयाने त्यावर घातलेली बंदी उठवावी, अशी मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.

First published on: 15-08-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr kalyan gangwal demands to remove ban on santhara vow