विधानसभेत जे काही घडले ते योग्य नव्हते. यशवंतराव चव्हाण यांनी ज्या विचारांचा पाया महाराष्ट्रात घातला, त्यांचे स्मरण जरी केले असते तरी ‘ते’ घडले नसते, असे सांगत समाजात तुम्ही ‘विशेष’ असला तरी शिष्यांच्या, समर्थकांच्या विळख्यात राहून तुमचा आसाराम बापू होऊ देऊ नका, असा सल्ला मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेला उद्देशून ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ असे लिहिले. आताचा कारभार पाहता किती वेळा तसे म्हणावे लागेल, अशी टिपणीही त्यांनी केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी शाखा आयोजित निगडीतील एकदिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. महापौर मोहिनी लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, पुणे मसापच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, शहराध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष माधुरी ओक, कोषाध्यक्ष सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले, अभिव्यक्ती कमी झाल्याने अनेक मानसिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मानसोपचाराचे रुग्ण वाढले, तशीच मानसोपचारतज्ज्ञांची संख्याही वाढली. जुन्या काळी व्यक्त होण्याची साधने होती, आता ती नाहीत. अभिव्यक्तीचा संकोच होऊ लागल्याने सामाजिक प्रश्न निर्माण झालेत. मानवी जीवनातील सर्व अंगे अभिव्यक्त झाली तरच वातावरण चांगले राहील. मात्र स्पष्टपणे भूमिका मांडली जात नाही. काही बोललो तर काय होईल, अशी भीती वाटते. वास्तविक लेखकांनी बोलले पाहिजे. त्यांचे बोलणे सत्तेला सहन होत नाही. मराठी लेखक राजकारणावर चांगले लिहित नाही, ही साहित्यातील कमकुवत बाजू आहे. मात्र द्वेषातून लिहू नये. द्वेषातून केलेले लिखाण मोठे होत नाही. सद्यस्थितीत प्रत्येक मनुष्य अस्वस्थ आहे, ही अस्वस्थता व्यक्त करण्याची मोठी संधी लेखकांना असूनही स्वत:वर मर्यादा घालून घेतल्याने व काहीतरी त्रास होण्याच्या धास्तीने बेधडक लिखाण करण्याची हिंमत होत नाही. व्यक्त न होणे ही पलायनवादी भूमिका असून ९० टक्के लेखक पलायनवादी असल्याचे दिसून येते. एकवेळ इंग्रजांवर लिहिणे सोपे होते. मात्र, स्वातंत्र्य असूनही काही लिहायचे की नाही, असा प्रश्न पडतो. रागदरबारी सारखे पुस्तक लिहिण्याची लेखकांची हिंमत का होत नाही, ‘तमस’ सारखे एकही पुस्तक मराठीत का नाही. मराठीचे लेखन दर्जेदार होण्यासाठी पांढरपेशीपणाचे कपडे उतरवून त्यापलीकडे गेलो तरच साहित्य अधिक समृध्द होईल, असे ते म्हणाले.
‘त्यांना’ साहित्यिक बैठक नव्हती!
मुंबईकडे ‘बॉलिवूड’ म्हणून पाहिले जाते. तसे साहित्याची पंढरी म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख व्हावी, अशी अपेक्षा आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली. शहरात होणाऱ्या कार्यक्रमातून तशी ओळख निर्माण होत असते. लौकिक अर्थाने शहर श्रीमंत होण्याची अपेक्षा शहरातील साहित्यिक पूर्ण करतील. विधानसभेत जे घडले, त्याचे समर्थन करता येणार नाही. ‘त्यांना’ साहित्यिक बैठक नव्हती म्हणून तसे घडले असावे, अशी टिपणी त्यांनी केली.