पुणे: हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘कोई दिवाना कहता है कोई पागल समझता है’ अशा अनेक रचना लोकप्रिय आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात डॉ. कुमार विश्वास यांनी ‘कवी की कल्पना से’ या विषयावर संवाद साधला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुरुवातीला विनोद तावडे यांनी विश्वास कुमार शर्मा असे मूळ नाव असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या नावाची गोष्ट सांगितली. त्यानंतर तावडे डॉ. विश्वास यांना ‘हम पुरी खबर रखते है’ असे म्हणाले. भाषणानंतर तावडे डॉ. विश्वास यांचे बोलणे ऐकण्यासाठी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसले.
हेही वाचा… पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
डॉ. कुमार विश्वास यांनीही त्यांच्या भाषणात तावडे यांना कोपरखळी मारली. ‘तुम्ही माझे चाहते आहात म्हणून समोर बसलात असे नाही. तर माझे ऐकलेले लोक मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले. त्यामुळे आता तुम्ही ऐकताय तर तुम्हीही मोठे व्हाल,’ अशी टिप्पणी केली. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये हास्यस्फोट झाला. सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे, असे स्पष्ट मत डॉ. कुमार विश्वास यांनी मांडले.