पुणे: पुस्तकांमुळे वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. मात्र वेब सीरिज, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या कल्पना दृश्यांतून बंदिस्त केल्या जातात. पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग आहे. एकवेळ पिझ्झा, कपडे अशा गोष्टींवरील खर्च कमी करा, पण पुस्तके विकत घेऊन वाचा. पुस्तकांमुळे आत्म्याची ‘इम्युनिटी’ वाढते. वाचलेले मनात राहते आणि कधी ना कधी कामी येते, असे डॉ. कुमार विश्वास म्हणाले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात कवी की कल्पना से या विषयावर डॉ. कुमार विश्वास यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसेनजित फडणवीस या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा… बहुचर्चित दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता येरवडा कारागृहात… कुत्ता नाव का पडले?
गेली ३५ वर्षे, ४४ देशांत रंगमंचावरून कविता सादर करत असल्याचे सांगून डॉ. कुमार विश्वास यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. चांगले असणे आणि यशस्वी असणे यात फरक आहे. त्यामुळे चांगले होण्यासाठी वाचणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयाचे विविध आयाम समजून घेण्यासाठी विविध प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे, असे स्पष्ट मत डॉ. विश्वास यांनी मांडले.