आपल्याआधी डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा सत्कार करण्याची विनंती करत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘विद्या विनयेन शोभते’ या सुभाषिताची प्रचिती पुणेकरांना दिली.संस्कृती आणि अध्यात्मिक पुस्तकांचे प्रकाशन करणाऱ्या प्रसाद प्रकाशनाच्या अमृतमहोत्सवी सांगता कार्यक्रम मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाला. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर आणि राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे या नात्याने व्यासपीठावर होते. प्रास्ताविकानंतर प्रसाद प्रकाशनच्या संचालिका उमा बोडस यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार सुरू झाले.
हेही वाचा >>>वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जमवले १८ लाख रुपये! विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ७०० विद्यार्थ्यांचा ‘आत्मनिर्भर’ उपक्रम
अर्थातच सरसंघचालक मोहन भागवत यांचा सत्कार करावा, अशी सूचना निवेदिकेने केली. त्यानुसार सत्कार करण्यासाठी बोडस या भागवत यांच्यापाशी आल्या खऱ्या. पण, आधी देगलूरकर सरांचा सत्कार करावा, असे दस्तुरखुद्द भागवत यांनी सुचविले. त्यांच्या या कृतीला सभागृहातील रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देगलूरकर यांच्या सत्कारानंतर भागवत यांनी सत्काराचा स्वीकार केला.