पुणे : केवळ ‘मेरा भारत महान’ वगैरे जयघोषाने काही होणार नाही. भारताला आर्थिकदृष्टय़ा शक्तिशाली बनवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने कठोर परिश्रम करून वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणा अंगिकारणे हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन इन्फोसिसचे संस्थापक डॉ. नारायण मूर्ती यांनी गुरुवारी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित ‘जी २० फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या व्याख्यानमालेत डॉ. मूर्ती बोलत होते. सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी या वेळी उपस्थित होते. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मूर्ती यांनी मनमोकळेपणाने उत्तरेही दिली.
व्याख्यानात डॉ. मूर्ती यांनी पुण्यातील दिवस, इन्फोसिसची स्थापना आदी आठवणींना उजाळा दिला. डॉ. मूर्ती म्हणाले, ‘‘तुम्ही उद्योजक म्हणून प्रतिष्ठा मिळवल्यास ग्राहक तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येतात. तसेच चांगले नोकरदारही येतात. गुंतवणूकदारांमध्ये प्रतिष्ठा मिळवल्यास मोठी आणि दीर्घकालीन गुंतवणूक मिळू शकते. समाजात प्रतिष्ठा मिळवल्यास वेगवेगळय़ा पद्धतीने फायदा होतो. तसेच सरकारसाठी काम करताना भ्रष्टाचाराला, अनैतिक गोष्टींना बळी पडावे लागत नाही. उच्च दर्जाच्या गुणवत्तेसह सातत्यपूर्ण कामगिरी करणे हा प्रतिष्ठा मिळवण्याचा मार्ग आहे. तुमच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेतली जाते. त्यामुळे आदर मिळतो आणि त्याचे रूपांतर सत्तेत होते. त्यामुळे आपण चांगले, प्रामाणिक नागरिक झाले पाहिजे. स्वत:चे आणि दुसऱ्यांसाठीही हक्क मिळवले पाहिजेत. देशाची प्रतिष्ठा वाढण्यासाठी जे काही करायला हवे ते केले पाहिजे. देश आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्यास सामाजिक सक्षमता आपोआपच येईल.’’
‘‘काम करताना आव्हाने येतच असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही वेळा समूह लागतो, काही वेळा तडजोड करावी लागते, काही वेळा वैयक्तिक त्रास सहन करावा लागतो. पण, आव्हानांना कसे सामोरे जातो हे महत्त्वाचे असते,’’ असे मूर्ती म्हणाले.
समस्या सोडवण्याचे शिक्षण प्राथमिक शाळेपासूनच हवे
भारतीय शिक्षण पद्धत प्रश्नांची परीक्षेत उत्तरे लिहिण्यात चांगली आहे. घोकंपट्टी करून उत्तरे लिहिली जातात. त्याचा बाहेरच्या जगात काहीच उपयोग नसतो. समस्या कशा सोडवायची याचे शिक्षण प्राथमिक शिक्षणापासूनच दिले पाहिजे. तरच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण होईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. महाविद्यालयातील शिक्षकांच्या भाषणाचा काहीच उपयोग नाही, असे मूर्ती म्हणाले.
देशात दर्जेदार बाजार संशोधन संस्थेचा अभाव’
भारतात दर्जेदार बाजार संशोधन संस्थेचा अभाव असल्याचे निरीक्षण मूर्ती यांनी नोंदवले. त्यामुळे उद्योजक अवाजवी बाजारसंधीचे चित्र निर्माण करतात. प्रत्यक्षात अशा कंपन्यांचे नीट मूल्यांकन झालेले नसते आणि अखेर त्यांना मोठय़ा तोटय़ाला सामोरे जावे लागते, असे मूर्ती म्हणाले.