डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात शस्त्रास्त्र पुरविल्याच्या आरोपावरून मनीष रामविलास नागोरी ऊर्फ मन्या (वय २४, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) आणि विकास रामअवतार खंडेलवाल (वय २२, रा. इचलकरंजी) यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. खंडेलवाल याच्याकडे सापडलेले पिस्तूल आणि डॉ. दाभोलकर यांना लागलेल्या गोळ्या यांच्यात साम्य असल्याचा शस्त्रास्त्र तज्ज्ञांचा अहवाल आला आहे. त्यानुसार न्यायालयाच्या परवानगीने दोघांना अटक केली असून अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांनी दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख आणि साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा गेल्या २० ऑगस्ट रोजी सकाळी पुण्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. गेल्या पाच महिन्यांपासून या गुन्ह्य़ाचा तपास पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि मुंबई पोलीस, एटीएस करत होते. या गुन्ह्य़ाचा कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींचे रेखाचित्रही जाहीर केले होते. त्याच बरोबर आरोपींनी गुन्ह्य़ात वापरलेल्या दुचाकीचाही राज्यात शोध घेतला होता. हा गुन्हा सुपारी देऊन केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे कारागृहातील सर्व सुपारी देऊन हत्या करणाऱ्या आरोपींकडे चौकशी केली होती.
ठाणे येथील खंडणीच्या गुन्ह्य़ात ऑगस्ट महिन्यात ठाणे पोलिसांनी नागोरीला अटक केली होती. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने अनेक अग्निशस्त्र विक्री केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुणे विद्यापीठातील सुरक्षारक्षक खून प्रकरणी आणि हिंजवडीतील एका अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी नागोरीसह चौघांना अटक केली होती. हे सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात होते. त्यानुसार डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या गुन्ह्य़ात वर्ग करण्याची मागणी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने या गुन्ह्य़ात वर्ग करण्यास परवानगी दिल्यानंतर दोघांना सोमवारी रात्री ठाणे मध्यवर्ती कारागृहातून अटक केली आहे. याबाबत गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी सांगितले, की बॅलेस्टिक अहवालावरून या दोघांनी मारेकऱ्यांना शस्त्र पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Story img Loader