पुण्यासारख्या शहरामध्ये पुरोगामी विचार मांडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या व्यक्तीचा खून होतो व त्यांचे खुनी सापडू नये, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. राज्याचे शासन प्रबळ आहे, मोठे पोलीस दलही आहे. दाभोलकरांविषयी काही विधाने अनेक व्यक्ती करीत होत्या. पण, कुणी पकडले जात नाही, याचा अर्थ अशा प्रवृत्तींना समाजात काहींचा पाठिंबा आहे, असे वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी केले.
साधना ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शनिवारी महाराष्ट्र फाऊंडेशनच्या (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कारांचे वितरण न्यायमूर्ती गोखले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्था, ‘एमकेसीएल’चे विवेक सावंत, सामाजिक कार्यकर्ते धनाजी गुरव, डॉ. अशोक गोडबोले, गजानन खातू यांना समाजकार्य पुरस्कार, तर ‘दिव्य मराठी’चे संपादक कुमार केतकर, लेखिका संध्या नरे-पवार, अमिता नायडू, अशोक पवार यांना साहित्य पुरस्कार त्याचप्रमाणे मकरंद साठे व राजकुमार तांगडे यांना नाटय़ पुरस्कार देण्यात आला. ‘रयत’चा पुरस्कार संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी स्वीकारला. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. निळकंठ रथ, फाऊंडेशनचे सुनील देशमुख त्या वेळी उपस्थित होते.
न्यायमूर्ती गोखले म्हणाले की, दाभोलकरांच्या खुनानंतर वातावरण निर्माण झाले व नंतर शासनाला जादूटोणा विरोधी कायदा करण्याची जाग आली. हा कायदा करण्याच्या प्रक्रियेतही अनेकांचा विरोध झाला. आपल्याला समाज सुधारणेचे कायदे हवे की नको? दाभोलकर सुधारणेसाठीच काम करीत होते. त्यासाठी त्यांची हत्या व्हावी, ही वाईट गोष्ट. जादूटोणा विरोधी कायदा अखिल भारतीय पातळीवर झाला पाहिजे. कारण हा प्रश्न केवळ महाराष्ट्राचा नाही. राज्यात हा कायदा झाला म्हणून आनंदात राहू नका, कारण त्यालाही आव्हान निर्माण होऊ शकते. त्यामुळे केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी व्हावी. कायद्याबाबत जागृती करावी.
पुरस्काराबाबत शिंदे म्हणाले की, कर्मवीरांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या लोकांचा हा पुरस्कार आहे. समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन शिक्षण आहे. समाजावर प्रेम करणारे नागरिक तयार झाले, तरच त्यातून राष्ट्राची बांधणी होईल. संस्काराचे कामही महत्त्वाचे आहे. ध्येय, समर्पन भाव असल्याशिवाय राष्ट्रबांधणी होणार नाही.
विवेक सावंत म्हणाले की, डॉ. दाभोलकरांनी परिवर्तनाचे विचार समाजात रुजविण्याचे काम केले. त्यांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. हा पुरस्कार माझ्या कामाची पावती नाही, तर पुढे काय करायचे याचे दिशासूचक आहे.
‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर साधना ट्रस्टचे विश्वस्त हमीद दाभोलकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Story img Loader