डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात धर्माध शक्तींविरुद्ध पुरावा नाही म्हणून त्यात कुणाला क्लीन चिट दिली असे नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी केले. हत्येचा तपास लवकर लागला पाहिजे, आता सरकारलाही थांबता येणार नाही, असे विधानही त्यांनी केले.
पुण्यात एका कार्यक्रमाला आले असताना गृहमंत्र्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे कोणत्याही हिंदूू गटाचा हात असल्याचा कुठलाही पुरावा तूर्तास तरी हाती लागला नाही. याबाबतचे प्रतिज्ञापत्र पुणे पोलिसांकडून गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आले. त्याबाबत त्यांना विचारले असता, या प्रतिज्ञापत्राबाबत आपण माहिती घेतली आहे. ते सादर करण्यापूर्वी त्याची आपल्याला माहिती नव्हती. मात्र, तपासाबाबत असे प्रतिज्ञापत्र पोलीस परस्पर देऊ शकतात.
डॉ. दाभोलकर यांचा तपास सर्व शक्यता गृहीत धरून करण्यात येत आहे. त्यामुळे पुरावा नाही म्हणून कुणाला क्लीन चिट नाही. तपासाला वेळ लागतो आहे. पण, पोलीसही काम करत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना या तपासात मदत करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार त्यांची मदत मिळते आहे. हा तपास लवकर लागणे महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. या तपासाबाबत डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे.
जयंत पाटील यांना मात्र ‘क्लीन चिट’
ऊस आंदोलनाच्या कालावधीत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या कथित वादग्रस्त ध्वनिफितीबाबत आर. आर. पाटील यांना विचारले असता, ‘या प्रकरणी जयंत पाटील यांनी स्वत: खुलासा केला आहे. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यासारखे काही नाही,’ असे सांगत त्यांनी या प्रकरणात जयंत पाटील यांना क्लीन चिट दिली. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाबाबत ते म्हणाले की, आंदोलन मागे घेतल्याने आनंद वाटला. पण, एक महिना उशीर झाला. त्यातून मोठे नुकसान झाले. त्यामुळे आंदोलन करून त्यांनी काय मिळविले? शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे.

Story img Loader