डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सुपारी देऊन नियोजितपणे तसेच शार्प शूटरकडूनच झाली असल्याने त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्यासाठी पिस्तूल व रिव्हॉल्व्हरशी संबंधित गुन्ह्य़ांची गेल्या दहा वर्षांतील माहिती पोलिसांनी जमा केली असून, डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी शस्त्र कुठून पुरविली गेली किंवा ती कुणी विकत घेतली याची चौकशी केली जात आहे.
डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये पोलिसांनी विविध शक्यता गृहीत धरून तपास केला. सध्या पोलिसांनी काही ठरावीक व ठोस शक्यतांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, पोलिसांच्या हाती अजून ठोस काही लागलेले नाही. ही हत्या सुपारी देऊन व शार्प शूटरकडून घडविण्यात आली असल्याच्या शक्यतेवर पोलीस आल्याने सुरुवातीच्या काळात असलेल्या काही शक्यता मागे पडल्या आहेत. त्यामुळे तपासाला आता ठरावीक दिशा मिळाली आहे. हल्लेखोरांचे रेखाचित्राशी साम्य असलेल्या गुन्हेगारांचाही शोध घेतला जात असून, साक्षीदाराच्या माध्यमातून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
पिस्तूल व रिव्हॉल्व्हरशी संबंधित गेल्या दहा वर्षांतील सर्व गुन्ह्य़ांची माहिती पोलिसांनी काढली आहे. या माहितीवरून त्या गुन्ह्य़ात सहभागी असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचा शोध घेतला जात आहे. संबंधित आरोपी सध्या कुठे आहेत, याची माहिती काढली जात आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेले त्याचप्रमाणे जामिनावर सुटलेले किंवा फरार झालेल्यांचीही माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, शहर गुन्हे शाखेबरोबरच पोलिसांच्या विविध यंत्रणा या प्रकरणात समांतर तपास करीत असताना आता बॉम्ब शोधक व नाशक पथकालाही या हत्येच्या तपासाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा