डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांची तपासात प्रगती नसल्याचे कारण देत वाढविण्यात आलेल्या पोलीस कोठडीच्या विरोधात आरोपींच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेली पुनर्विचार याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी नागोरी व खंडेलवाल यांना २१ जानेवारीला अटक केले होते. न्यायालयाने त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. ती मुदत संपल्यानंतर कोठडीत ४ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली. याबाबत आरोपीचे वकील बी. ए. अलूर यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली. आरोपींची पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयापुढे सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमधील कारणे ही पहिल्यांदा देण्यात आलेल्या पोलीस कोठडीचीच आहेत. त्यात काही बदल नाही. तपासात प्रगती नाही. आरोपींकडून कोणताही पुरावा जप्त करायचा नाही. त्यामुळे आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणे अपेक्षित होते, असे पुनर्विचार याचिकेत म्हटले होते.
मात्र, दोघांकडून ४५ पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. याबाबत तपास करण्यासाठी पोलिसांना वेळ मिळाला पाहिजे. त्यासाठी पोलीस कोठडची गरज आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे शशिकांत जगताप यांनी केला. तो ग्राह्य़ धरून न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.
आरोपींच्या पोलीस कोठडीविरुद्धची याचिका न्यायालयाने फेटाळली
आरोपींची पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयापुढे सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमधील कारणे ही पहिल्यांदा देण्यात आलेल्या पोलीस कोठडीचीच आहेत. त्यात काही बदल नाही.
First published on: 02-02-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr narendra dabholkar murder case