ग्रीसच्या आर्थिक संकटाचे परिणाम हे केवळ ग्रीसपुरते किंवा युरोपियन युनियनपुरतेच मर्यादित नाहीत, तर ते जागतिक स्वरूपाचे आहेत, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी सोमवारी व्यक्त केले. ग्रीसची कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि चीनमधील घडामोडींचा परिणाम भारतावरही काही प्रमाणात होणार आहे. भारतीय जनतेमुळेच देशाची आर्थिक स्थिती मजबूत असली तरी योग्य आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये ‘जागतिक महामंदी आणि भारत’ या विषयावर डॉ. जाधव बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर आणि सरचिटणीस योगिराज प्रभुणे या वेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, युरोपियन युनियनमध्ये २७ देश असले तरी सर्वाचे चलन एक नाही. त्यापैकी १६ देशांनी युरो हे चलन स्वीकारले. ग्रीसने जर्मनीसह अन्य युरोपियन राष्ट्रांकडून २२० अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले. मात्र, ते अनुत्पादित गोष्टींवर खर्च केल्याने या कर्जाची परतफेड करणे जमले नाही. ग्रीसशी भारताचा व्यापार तुलनेने कमी असला तरी युरोपियन राष्ट्रांशी व्यापार मोठा आहे. काटकसरीच्या अटी मान्य करायच्या का, या विषयी तेथील सरकारने सार्वमत घेतले तेव्हा अटी ठोकरून देण्याच्या बाजूने कौल मिळाला. मात्र, कर्ज कसे फेडणार याचे उत्तर कोणाकडेही नाही. ग्रीस बाहेर पडला तर युरोपाच्या एकत्वाला तडा जाऊ शकतो. जर्मनी आणि फ्रान्स या संपन्न राष्ट्रांना ग्रीस रशियाकडे जाण्याची भीती वाटते. सीरिया आणि इराकमधील निर्वासित युरोपिय देशांमध्ये येऊ इच्छित असून त्यासाठीचा ग्रीस हाच मार्ग आहे. त्यामुळेच ग्रीसचे संकट हा प्रश्न युरोपियन समुदायाच्या भवितव्याचा प्रश्न झाला आहे.
चीनमधील अंतर्गत घडामोडींमुळे थेट गुंतवणूक कमी होत आहे. त्या गुंतवणुकीतील काही वाटा भारताकडे येण्याची शक्यता आहे. मात्र, तेथील अर्थव्यवस्था कोसळेल अशी शक्यता नाही. भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून आर्थिक धोरणाला योग्य परिमाण दिले तर दोन-तीन वर्षांत विकास दर नऊ ते दहा टक्के गाठता येणे शक्य होईल, असेही जाधव यांनी सांगितले.

Story img Loader