पुणे : ग्रामीण विकास आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या ‘महादेव बळवंत नातू सेवागौरव’ पुरस्कारासाठी यंदा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील डॉ. संजीवनी केळकर यांची, तर ‘सेवाव्रती कार्यकर्ता’ पुरस्कारासाठी पुणे जिल्ह्यातील अशोक देशमाने यांची निवड करण्यात आली आहे.
नातू ट्रस्टचे विश्वस्त चंद्रशेखर यार्दी, विवेक गिरिधारी आणि अभया टोळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. सोमवारी (९ जानेवारी) महादेव बळवंत तथा भाऊसाहेब नातू यांच्या ३६ व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. संजीवनी केळकर यांना देण्यात येणाऱ्या ‘सेवागौरव’ पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल आणि स्मृतिचिन्ह असे आहे. हा पुरस्कार प्रामुख्याने एक तपाहून अधिक काळ ध्येयवादी वृत्तीने सामाजिक सेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला दिला जातो. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यासारख्या दुष्काळी भागात ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या माध्यमातून डॉ. संजीवनी केळकर या ग्रामीण महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन, अन्याय निवारण, आरोग्य, पाणी टंचाई निवारणाचे काम सुमारे दोन तपांहून अधिक काळ करत आहेत.
हेही वाचा – कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; पतीला जन्मठेप
अशोक देशमाने यांची ‘सेवाव्रती कार्यकर्ता’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे जिल्ह्यातील स्नेहवन संस्थेमार्फत आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार आणि शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. याबरोबरच यंदा जालना वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान (एक लाख रुपये), ज्ञान प्रबोधिनी सोलापूर (९१ हजार रुपये) श्रीगुरुजी रुग्णालय, नाशिक (७५ हजार रुपये), जनकल्याण समिती आणि अस्तित्व प्रतिष्ठान (प्रत्येकी ५० हजार रुपये), श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर, धुळे (२० हजार रुपये) आणि छात्रप्रबोधन (१० हजार रुपये) या संस्थांना देणगी दिली जाणार आहे.