-रवींद्र उटगीकर
जोखीम न पत्करणे ही आयुष्यातील सर्वांत मोठी जोखीम ठरते – मार्क झकेरबर्ग
हाता-तोंडाची मिळवणी करताना कष्ट पडले, तरी ताठ मानेने जगावे असे संस्कार देणाऱ्या, अभ्यासात गती मिळवली, तरच उत्कर्षाचा मार्ग शोधता येईल असे विचार बिंबवणाऱ्या आणि आयुष्यात पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचा सर्वोत्तम वारसा गाठी बांधलेली संपत्ती नव्हे, तर चारित्र्य आणि निष्ठा हीच असते, अशी बैठक देणाऱ्या घरात त्यांचा जन्म आणि जडणघडण झाली. आजोबांची प्रेरणा आणि वडिलांचा पेशा यांमुळे ते आपल्या मातीशी घट्ट जोडले गेले. उच्च शिक्षणामुळे भरारी घेण्याचे पंख लाभल्यानंतरही ती नाळ तुटण्याऐवजी आणखी भक्कम होत गेली. त्यातून एका उद्यामविश्वाची पायाभरणी झाली… आज चाळिशीच्या वळणावर पोचलेला हा उद्याोगाचा डोलारा विकसित देश होण्याच्या भारताच्या स्वप्नातील वाटेकरी झाला आहे. सुरक्षित आणि सुखनैव भवितव्याची वाट निवडण्याचा पर्याय समोर असताना भारताचे भविष्य सुनिश्चित करण्याचा त्यांनी निवडलेला पर्याय आता देशाचा अमृतकाळ उजळवत आहे.
ही यशोगाथा आहे डॉ. प्रमोद चौधरी या उद्याोजकाची. स्वातंत्र्यसैनिक कृष्णाजी नरहर तथा सेनापती दादा चौधरी यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. कायदेभंगाच्या चळवळीत दादांना तुरुंगवास भोगावा लागला होता. प्रमोद यांच्याकडे एकीकडे आजोबांकडून हा देशप्रेमाचा वारसा आलेला, तर वडील मधुकर यांच्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र आणि साखर कारखानदारी यांच्याशी नाते जडले. मधुकर चौधरी हे शेती अधिकारी. त्यांच्या नोकरीमुळे प्रमोद यांचे बालपण अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी आणि सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गेले. वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे आठवीनंतरच्या शिक्षणासाठी प्रमोद आपल्या धाकट्या बहिणीसोबत पुण्यात आजी-आजोबांकडे आले. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेतून मॅट्रिक होताना ते बोर्डामध्ये झळकले! तेथून फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेऊन पुढे मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या देशातील प्रतिष्ठेच्या आणि अव्वल अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला. त्या काळी आयआयटीचे शिक्षण हे परदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि सुखसंपन्न जीवनाची शाश्वती देणारे मानले जात असे. परंतु याच शिक्षणाने प्रमोद चौधरी यांच्या स्वप्नांमध्ये वेगळे रंग भरले. ते रंग होते स्वदेशीचे, स्वनिर्मितीचे, स्व-तंत्रज्ञान विकासाचे! भारतामध्ये राहूनच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाधारित, स्वयंअभिकल्पित आणि स्वदेशी बनावटीच्या अशा एखाद्या उत्पादनासाठीचा उद्याोग आपण सुरू करावा, हे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. परंतु त्यासाठीही प्रत्यक्ष कामाचा अनुभव स्वाभाविकच गरजेचा होता. त्यामुळे थेट उद्याोजकतेच्या खंदकात उडी टाकण्याआधी नोकरीचा अनुभव घेण्याचे त्यांनी ठरवले. शॉप फ्लोअरपासून मार्केटिंगपर्यंत आणि अर्थकारणापासून व्यवस्थापनापर्यंत विविध पैलू जवळून पाहण्यासाठी सुमारे एका तपाचा अनुभव घेतला. आता पुन्हा उद्याोजकतेचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यासाठी त्यांनी त्यांचे चुलतभाऊ संजय तथा राजू यांच्यासह पुण्याजवळ भोसरी येथील एमआयडीसीमध्ये जागा घेतली.
आणखी वाचा-वर्धानपनदिन विशेष : पुण्यातील तंत्रज्ञान क्षेत्राचे रूप पालटणारा ‘आनंद’
दोघांच्या नावांच्या इंग्रजी आद्याक्षरांवरून प्राज इंजिनिअरिंग या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. माणूस प्रगतीच्या वाटा कितीही पायाखाली घालत गेला, तरी तो आपल्या मुळापासून तुटत नाही. स्वत:चा उद्याोग कोणत्या स्वरूपाचा असावा, याचा विचार करत असताना तर ती नाळ भक्कमच होत गेली. एका साखर कारखान्यासाठी डिस्टिलरी प्रकल्प आणि त्यासाठीची यंत्रसामग्री उभारणे हे प्रमोद चौधरी यांच्या कंपनीला मिळालेले पहिले काम ठरले. त्या निमित्ताने डिसेंबर १९८३पासून ‘प्राज’ची वाटचाल सुरू झाली. या क्षेत्रात आपली गुणवत्ता आणि विश्वासार्हता प्रस्थापित करत असतानाच आयसीआयसीआयच्या साहसवित्त गुंतवणुकीमुळे त्यांची उमेद आणखी वाढली. त्यामुळे शेतीप्रक्रिया उद्याोग हीच त्यांची नजीकच्या काळासाठीची दिशा राहिली. इथेनॉल उत्पादनासाठी त्यांनी स्वत:चे संशोधन व विकास केंद्र स्थापन केले. त्यातून या क्षेत्राशी त्यांचे नाव पक्के जोडले गेले. लवकरच साखर कारखानदारीसाठीची यंत्रसामग्री पुरवणारी कंपनी म्हणून ‘प्राज’चे नाव होऊ लागले. ‘प्राज’च्या स्थापनेला एक दशक पूर्ण होण्याच्या आतच कंपनीने उभे केलेले इथेनॉल प्रकल्प देशाच्या विविध भागांत कार्यान्वित झाले. १९९४मध्ये कंपनीने भांडवल बाजारात आणलेल्या इनिशिअल पब्लिक ऑफरिंगला (आयपीओ) मिळालेला अफाट प्रतिसाद ही त्याचीच प्रचिती होती. त्यानंतर राकेश झुनझुनवाला, विनोद खोसला आणि रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गजांनी या कंपनीच्या उज्ज्वल भविष्यात गुंतवणूक केली. २००८मध्ये ‘प्राज मॅट्रिक्स’ ही जैवअर्थव्यवस्थेच्या, तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेच्या संबंधातील स्वतंत्र आणि सुसज्ज अशी संशोधन आणि विकास प्रयोगशाळा ‘प्राज’ने उभारली. केंद्र सरकार प्रमाणीकृत संशोधन व विकास केंद्र म्हणून या प्रयोगशाळेला मान्यताही मिळाली.
आणखी वाचा-वर्धानपनदिन विशेष : गाव ते जेएनपीटी… राजेंद्र साळवेंचा यशस्वी प्रवास
सन २०१०च्या दशकात सातत्याने फुगत चाललेल्या खनिज तेलाच्या किमतींमुळे इथेनॉलकडे पर्यायी इंधन म्हणून पाहिले जाऊ लागले. परंतु त्यासाठी शेतमालाचा, खास करून अन्नधान्याचा वापर होणे यावर मतमतांतरे होऊ लागली. त्यातून इथेनॉलनिर्मितीसाठी पर्यायी तंत्रज्ञानाची गरज व्यक्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर वाया जाणाऱ्या शेतमालापासून इथेनॉलनिर्मितीचे तंत्रज्ञान डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झाले. उसाचे पाचट, गव्हाचे काड, ज्वारीचे धाट, तांदळाचे ताट, मक्याचे दाणे काढलेला कणसाचा भुट्टा, कापसाचे देठ अशा सर्व प्रकारचा शेतकचरा हा शेतकऱ्यांना संपत्ती देणारा ठरू शकेल, असे हे तंत्रज्ञान आहे. भारतातील तेलउत्पादक कंपन्यांनीही त्यामध्ये रस दाखवून त्यासाठीचे शोधन प्रकल्प उभारण्याची जबाबदारी ‘प्राज’वर सोपवली. एवढ्याच यशावर समाधानी न राहता ‘प्राज’ने टाकाऊ शेतमालापासून संपीडित जैववायूनिर्मितीचे (कॉम्प्रेस्ड बायोगॅस – सीबीजी) तंत्रज्ञानही विकसित केले. इतकेच नव्हे, तर हवाई वाहतूक क्षेत्रातील कार्बन निस्सारणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करताना हवाई वाहतुकीसाठी लागणाऱ्या जैवइंधनाचे (सस्टेनेबल अॅव्हिएशन फ्युएल) तंत्रज्ञानही विकसित केले. ‘प्राज’च्या भागीदारीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे पुरवलेल्या स्वदेशी उत्पादित शाश्वत विमान इंधनाचे मिश्रण वापरून भारतातील पहिले व्यावसायिक प्रवासी उड्डाण (एअर एशिया, पुणे ते दिल्ली) मे २०२३मध्ये यशस्वीपणे पार पडले. पर्यावरणस्नेही पर्यायी इंधननिर्मितीचा हा पट म्हणजे ‘प्राज’च्या यशोमुकुटातील मानाचा तुराच ठरत आहे. जैवचलत्वाच्या (बायोमोबिलिटी) क्षेत्रातील या यशानंतर जैवलोलकाची (बायोप्रिझम) संकल्पनाही ‘प्राज’ने प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अक्षय रसायने आणि जिन्नसांच्या (रिन्युएबल केमिकल्स अँड मटेरिअल्स – आरसीएम) क्षेत्रातही कंपनीने प्रवेश केला आहे. वाहन, वेष्टण, गृहसजावट, बांधकाम, शेती आणि खाद्यान्न अशा अनेकविध क्षेत्रांत हे तंत्रज्ञान आमूलाग्र परिवर्तन करेल, अशी चिन्हे आहेत. नुकत्याच सादर केलेल्या हंगामी केंद्रीय अर्थसंकल्पात जैवउत्पादनांच्या क्षेत्राला चालना देणारी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हे क्षेत्र नजीकच्या काळात विशेष चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत.
आणखी वाचा-वर्धानपनदिन विशेष : ऊर्जा, आरोग्यासाठी ‘प्रयास’
तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, उत्पादन, प्रकल्प व्यवस्थापन आणि कंपनी प्रचालन (ऑपरेशन्स) या पाच क्षेत्रांतील जगभरातील १००हून अधिक देशांतील विविध प्रकल्पांसंबंधीचे ‘प्राज’कडे हजारपेक्षा जास्त संदर्भ आहेत. पर्यावरणस्नेही औद्याोगिक जैवतंत्रज्ञानाप्रमाणेच पाणी हीदेखील संपत्ती होऊ लागल्याच्या जाणिवेतून ‘प्राज’ने औषधनिर्मिती उद्याोगांची गरज असणारे ‘हाय प्युरिटी’च्या रूपातील पाणी आणि उद्याोगांच्या प्रक्रियांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया या क्षेत्रातही स्वत:चा ठसा उमटवला आहे. औद्याोगिक सांडपाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ‘प्राज’ने शून्य जलविसर्ग (झीरो लिक्विड डिस्चार्ज – झेडएलडी) ही संकल्पना रुजवून तसे प्रकल्प राबविले आहेत. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा ध्यास घेत सुरू केलेल्या डॉ. चौधरी यांच्या उद्यामशीलतेने नुकताच चार दशकांचा देदीप्यमान टप्पा पार केला आहे. जैवतंत्रज्ञान, तसेच चक्रीय जैवअर्थव्यवस्थेमधील डॉ. चौधरी यांच्या अथक आणि परिणामकारक योगदानाची दखल वैश्विक पातळीवर देखील घेतली गेली आहे. पर्यावरणस्नेह आणि तंत्रस्नेह यांचा सुरेख संगम व्यावसायिक आणि सामाजिक या दोन्ही आघाड्यांवर डॉ. चौधरी यांनी प्रत्यक्षात आणला आहे. त्यामुळेच ‘बायो इम्पॅक्ट’ या अमेरिकी संस्थेकडून देण्यात येणाऱ्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्काराचे ते २०२० मध्ये मानकरी ठरले. औद्याोगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय आणि केवळ दुसरे आशियाई आहेत. ‘डेली डायजेस्ट’ या अमेरिकी नियतकालिकाकडून देण्यात येणाऱ्या ‘होल्म्बर्ग पुरस्कारा’चे देखील ते २०२२ मध्ये मानकरी ठरले आहेत. हा सन्मान मिळविणारे डॉ. चौधरी पहिले भारतीयच नव्हे, तर पहिले आशियाई आहेत. आपल्या सहकाऱ्यांतील नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता यांना संधी देऊन त्यांच्यातील दायित्वभावना वाढीला लावणे म्हणजे आंत्रप्रेन्युअरशिप. ती डॉ. चौधरी यांनी ‘प्राज’मध्ये सर्व स्तरांवर रुजवली आहे. जगातील प्रगत जैवअर्थव्यवस्थांमधील नोकरी करण्यायोग्य सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून ‘प्राज’चा २०२० मध्ये झालेला गौरव ही त्याचीच पोचपावती आहे. सन २०२१ मध्ये तर ‘प्राज’ने प्रगत जैवअर्थव्यवस्थांमधील पहिल्या पन्नास कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेऊन आपल्या उज्ज्वल भवितव्याची झलकच जगाला दाखवली आहे. शाश्वततेचा पुरस्कार ‘प्राज’ने केवळ आपल्या व्यावसायिक वाटचालीतच नव्हे, तर सामाजिक उत्तरदायित्वातही केला आहे. कंपनीने आपल्या सामाजिक उपक्रमांसाठी (सीएसआर) आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण ही तीन क्षेत्रे निश्चित केली आहेत. ‘प्राज फाउंडेशन’मार्फत २००४पासून हे कार्य सुरू आहे. डॉ. चौधरी यांनी त्यांच्या वैयक्तिक ‘परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन’द्वारे देखील शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. शाश्वत जीवनशैलीच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशाच विकासवाटा दाखवत तंत्रज्ञान आणि नावीन्य यांची कास धरूनच आपण उद्याच्या विकसित भारताचे सुखावह स्वप्न साकारू शकतो, असे कार्व्हर पुरस्कार स्वीकारताना डॉ. चौधरी म्हणाले होते. त्या स्वप्नामध्ये डॉ. चौधरी आणि ‘प्राज’ शाश्वत रंगभरण करत अखिल मानव्याचे कल्याण साधण्याच्या दृष्टीने अधिक जोमाने प्रयत्नरत आहेत.