पुणे : विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कामकाजातील प्रशासकीय हस्तक्षेप दूर करण्याचे आश्वासन मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिले. त्यानंतर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मागे घेतला.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनामध्ये मराठी भाषेसंदर्भातील साधकबाधक चर्चेला प्राधान्य देण्याऐवजी केवळ करमणूकप्रधान आणि उत्सवी पद्धतीने उपक्रम साजरा करून उधळपट्टी करणे औचित्याला कितपत धरून आहे?, असा सवाल उपस्थित करून विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे ज्ञानमंडळे बरखास्त करण्याच्या निर्णयाचा राग धरून शासनाच्या भाषा विभागाने आणि वित्त विभागाने प्रशासकीय आणि वित्तीय अडवणूक सुरू केली, असा आरोप डॉ. दीक्षित यांनी आपल्या राजीनामापत्रात केला होता.
दीक्षित यांच्या राजीनाम्यानंतर मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने पुण्याला येऊन डॉ. दीक्षित आणि डॉ. मोरे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. डॉ. मोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर, या दोन्ही मंडळांच्या कामकाजातील प्रशासकीय हस्तक्षेप दूर करून मंडळांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले. त्यानंतर आम्ही दोघांनीही राजीनामा मागे घेतला, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
माझ्याकडे आणखी दीड वर्ष असून, या कालावधीत मला अधिक चांगल्या रीतीने काम करता येईल. विश्वकोशाच्या संदर्भात अनेक योजना मला खऱ्या अर्थाने राबविता येतील, असेही डॉ. दीक्षित यांनी स्पष्ट केले.
साहित्य आणि संस्कृती मंडळाचे काम करताना प्रशासकीय आणि वित्तीय अडवणूक केली जात होती. त्याखेरीज राज्य सरकारच्या अखत्यारीतील चार प्रमुख संस्था आणि संस्थांच्या प्रतिनिधींनाच बाजूला ठेवून विश्व साहित्य संमेलन घेण्यात आले. ही गोष्ट चुकीची वाटली. त्यामुळेच मी साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याबाबतचे राजीनामापत्रही मंडळाच्या सचिवांकडे बुधवारी (११ जानेवारी) पाठविले होते. मात्र, अडचणी दूर करण्याचे आश्वासन भाषा मंत्र्यांनी दिल्यानंतर राजीनामा मागे घेतला आहे, असे राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
साहित्य आणि संस्कृती मंडळाचे काम करताना प्रशासकीय आणि वित्तीय अडवणूक केली जात होती. मात्र मराठी भाषा विभाग मंत्र्यांनी काही अडचणी असतील त्या दूर करण्याचे आश्वासन दिले आणि पत्राद्वारे राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मंत्रीमहोदयांच्या आश्वासनानंतर मी राजीनामा मागे घेतला आहे.
– डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
तुम्ही आम्हाला हवे आहात, कृपया तुमचे काम चालू ठेवा, असे सांगत मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी राजीनामा मागे घेण्यासंदर्भात पत्रही दिले. मंत्रीमहोदयांशी चर्चा झाली. त्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेनंतर मी आणि डॉ. मोरे यांनी एकत्रितपणे चर्चा करून राजीनामा मागे घेतला आहे. – डॉ. राजा दीक्षित, अध्यक्ष, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ