संतसहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक व ‘बहुरूपी भारूड’कार डाॅ. रामचंद्र देखणे (वय ६६ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या घरामध्ये देखणे यांचा जन्म झाला. बी. एस्सी. आणि एम. ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादन केली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. ‘संत विचार प्रबोधिनी‘ ही दिंडी घेऊन देखणे अनेक वर्षे सातत्याने पंढरीची पायी वारी करीत असत.
हेही वाचा >>> पुणे : क्रिकेट सामन्यावर सट्टा , दोघांच्या विरोधात गुन्हा ; सॅलिसबरी पार्क परिसरात कारवाई
ललित, संशोधनात्मक तसेच चितनात्मक अशी त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, संतसाहित्यावरील चिंतनात्मक, लोकसाहित्यावरील संशोधनात्मनक आणि सामाजिक विषयांवरील वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि संपादित ग्रंथांमधून त्यांचे दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘बहुरुपी भारूड’ या संत एकनाथांच्या पारंपरिक भारूडांचे त्यांनी अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रात, इतर प्रांतात तसेच अमेरिका, दुबई येथे सादर केले असून त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यातील विविध व्याख्यानमालांमधून विविध विषयांवर त्यांनी हजारो अभ्यासपूर्ण आणि रसाळ व्याख्याने दिली आहेत.महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मे २०१० मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते सहभागी झाले होते. अमेरिकेतील विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये ते एका परिसंवादाचे अध्यक्ष होते.