पुणे : डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगतर्फे मानद आंतरराष्ट्रीय सदस्यत्व (इंटरनॅशनल मेंबरशिप) प्रदान करण्यात आले आहे. अमेरिकेत तब्बल २० वर्षे काम केल्यानंतर १९९० मध्ये डॉ. कुलकर्णी भारतात परतले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगतर्फे मानद आंतरराष्ट्रीय सदस्यत्वाने गौरवण्यात आले आहे.
डॉ. कुलकर्णी हे मूळचे इंदौर येथील आहेत. १९९० मध्ये अमेरिकेतून परतल्यानंतर ते पुणे येथे स्थायिक झाले. बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदवी पूर्ण केल्यानंतर न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पी. एचडी. पूर्ण केली. त्यांच्या नावावर ३८ एकस्व अधिकार प्राप्त संशोधने (पेटंट) आहेत तसेच त्यांच्या तांत्रिक संशोधनांची दखल अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी घेतली आहे. १९९० मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या एल्के सिलिकॉन्स (ELKAY Silicones) या कंपनीतर्फे शेती, फार्मास्युटिकल्स, पेट्रोकेमिकल्स, रबर, टायर, बांधकाम इत्यादी अनेक क्षेत्रातील उत्पादनांसाठी लौकिकप्राप्त आहे. अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील विशेष योगदानासाठी नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगतर्फे मानद आंतरराष्ट्रीय सदस्यत्व दिले जाते. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात या सदस्यत्वाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात डॉ. कुलकर्णी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.