भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल यांची अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या (एजीयू) देवेंद्र लाल मेडल २०२२चे मानकरी ठरले आहेत. डॉ. रॉक्सी यांच्या पृथ्वी आणि अवकाश संशोधनात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी या प्रतिष्ठित पदकासाठी निवड करण्यात आली असून, त्यासह त्यांना एजीयूचे सदस्यत्त्वही बहाल करण्यात आले.
हेही वाचा >>> निम्मे पुणे गुरुवारी पाण्याविना ; दुरुस्तीच्या कामांमुळे महापालिकेचा निर्णय
आयआयटीएमने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्रख्यात भूभौतिकशास्त्रज्ञ प्रा. देवेंद्र लाल यांच्या सन्मानार्थ अमेरिकन जिओफिजिकल युनियनतर्फे विकसनशील देशातील गुणवत्तापू्र्ण वैज्ञानिक संशोधन, संशोधनाचा परिणाम आणि त्या क्षेत्राच्या विकासातील योगदान अशा निकषांवर शास्त्रज्ञांचे मूल्यमापन करून सन्मान करण्यात येतो. डॉ. रॉक्सी यांच्या संशोधनामुळे दक्षिण आशिया आणि इंडो पॅसिफिक भागात विज्ञान, हवामान देखरेख, हवामान अंदाज, हवामान बदल अभ्यासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. त्यांचे संशोधन मान्सून, दुष्काळ, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा, सागरी पर्यावरण प्रणाली आणि परिणाम समजावून देते. तसेच आयपीसीसीच्या हवामान बदल मूल्यमापन अहवालातही त्यांचा सहभाग होता. हिंदी महासागरातील हवामान प्रणालीच्या संशोधनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या क्लीवर या कार्यक्रमाचे हिंदी महासागर प्रदेश समितीचे सध्या ते नेतृत्त्व करत आहेत. तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जगभरातील आघाडीच्या दोन टक्के शास्त्रज्ञांमध्येही त्यांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> प्रादेशिक पक्ष संपविण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव ; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे
‘पृथ्वी आणि अवकाश शास्त्रातील महनीयांबरोबर उभे राहण्याची संधी मिळाल्याने अतिशय आनंद झाला आहे. मला मिळालेला सन्मान हा माझा एकट्याचा नसून माझ्यासह काम केलेले शास्त्रज्ञ, विद्यार्थी, वैज्ञानिक समुदायाचा सन्मान आहे. विज्ञान समाजाच्या अधिकाधिक जवळ नेण्याच्या माझ्या प्रयत्नांनी माझ्या संशोधनाला आकार देतानाच मला पुरेपूर समाधान दिले’, अशी भावना डॉ. रॉक्सी यांनी व्यक्त केली.