इतिहास हा वर्तमानाचा भूतकाळ आहे. त्यामुळे इतिहासाचा वर्तमानाशी सांधा जुळविणे हाच माझ्या लेखनाचा प्रयत्न असतो, असे संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी सांगितले.
भारतीय साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते डॉ. सदानंद मोरे यांना ‘साहित्य’ आणि माजी आमदार उल्हास पवार यांना ‘सांस्कृतिक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अॅड. शशिकांत पागे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, संस्थेचे अध्यक्ष उद्धव कानडे आणि नरेंद्र व्यवहारे व्यासपीठावर होते. रेखा कोरे यांच्या ‘पाऊलवाट’ या कथासंग्रहाचे प्रकाशन या वेळी मिरासदार यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. मोरे म्हणाले,की संतसाहित्याचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करणारे अभ्यासक यांच्यामध्ये समन्वय नाही. संतसाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना प्राचीन, प्रतिगामी ठरविले गेले. राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण असा एकूणच लोकव्यवहार आणि संतांचा विचार यांच्यातील सांधा जोडण्याचे काम करण्याच्या उद्देशातून मी लेखन केले.
विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, सिद्धहस्त लेखक, संतसाहित्याचे अभ्यासक, प्रभावी वक्ते आणि द्रष्टे विचारवंत, असे फडकुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत मिरासदार यांनी त्यांचा स्मृतिदिन पुण्यामध्ये साजरा करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. उद्धव कानडे यांनी प्रास्ताविक केले. अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader