घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाला. संत नामदेवांच्या कर्मभूमीत एप्रिलमध्ये हे संमेलन होणार आहे.
मोरे यांच्यासाठी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेणारे ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोरे यांचे नाव सुचविले आहे. या अर्जावर पद्मगंधा प्रकाशनचे अरूण जाखडे, कवी उद्धव कानडे, सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेच्या सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आणि निकिता मोघे यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांच्याकडे सुपूर्द केला. अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याची २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sadanand more application for ghuman sahitya sammelan presidential election