डॉ. सदानंद मोरे, साहित्यिक

‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. वाचन हे मनावर संस्कार घडवणे किंवा भावविश्व समृद्ध करण्याखेरीज चांगला समाज निर्माण करण्यातही पोषक ठरते. त्यामुळे सकस, विचारपूरक आणि बुद्धीला चालना देणारे साहित्य वाचत राहणे आवश्यक आहे. आपण सगळेच दररोज काहीबाही वाचत असतोच, परंतु आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात आघाडीवर असलेली मंडळी नेमकं काय वाचतात, हे जाणून घेणारं त्यांच्याच शब्दांतील हे सदर..

एखादे पुस्तक आपण वाचतो. ते मनापासून आवडते. मग ते पुस्तक केव्हा प्रकाशित झाले ते वर्ष, तो महिना किंवा त्यावर तारीख असेल तर उत्तमच. त्या दिवशी किंवा त्या महिन्याला संबंधित पुस्तकाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे. पुस्तकातील काही भागांचे वाचन करून त्यावर मित्रांसमवेत चर्चा करायला हवी. शक्य असेल तर त्या पुस्तकाची प्रत आपल्या मित्राला भेट द्यायची. हा उपक्रम मी माझ्या परीने करतो. आपण माणसांचे वाढदिवस साजरे करतो, मग पुस्तकांचा वाढदिवस साजरा करायला काय हरकत आहे?

मी केव्हापासून वाचन करू लागलो याचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. याचे कारण ती तारीख ठाऊक नाही. अक्षरओळख झाली तेव्हापासून मी वाचन करतोय. वडिलांचा ग्रंथसंग्रह मोठा होता. त्यामुळे वाचनाची गोडी लागली ती अजूनही टिकून आहे. आमच्याकडे वेगवेगळय़ा विषयांवरची खूप पुस्तके होती. त्यामुळे कोणते पुस्तक पहिले वाचले हेदेखील सांगता येणार नाही. पण कथा-कादंबऱ्या, कविता, इतिहास, संतचरित्र अशा विविध विषयांवरील पुस्तकांपासून ते अगदी रहस्यकथाही वाचल्या आहेत. त्यामुळे वाचन करण्यासाठी कोणत्याही विषयाचे कधीच वावडे नव्हते. शाळेत असताना बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा अधाशीपणाने वाचल्या आहेत. अमुक एकच वाचले पाहिजे असे कधीच ठरवले नव्हते. त्या काळी वाचनाखेरीज मनोरंजनाचे दुसरे माध्यमही नव्हते आणि वाचन करतो म्हणून घरामध्ये कधी बोलणीही बसली नाहीत. अजूनही मी सर्वच विषय वाचत असतो.

लहानपणी माझ्यावर आचार्य अत्रे यांचा पगडा होता. घरी ‘मराठा’ यायचा. त्यामुळे ‘कऱ्हेचे पाणी’ हा दर रविवारी त्यांच्या आत्मचरित्राचा भाग मी ‘मराठा’मध्ये वाचत. पुढे नंतर ‘मी कसा झालो’ हेदेखील मी वाचून काढले आहे. ‘अमृत’, ‘नवनीत’, ‘नवभारत’, ‘युगवाणी’, ‘प्रसाद’ आणि ‘मसाप पत्रिका’ अशी मासिके घरी येत होती. कोणतेही मासिक असो वा पुस्तक हाती पडल्यानंतर पहिल्या पानापासून ते अखेरच्या पानापर्यंत वाचून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसत नसे. माझ्या वाचनामध्ये कधीच एकारलेपण नव्हते. त्यामुळे कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, रियासतकार सरदेसाई यांचे ‘छत्रपती शिवाजी’चे सर्व खंड, मार्क्‍सवाद, पं. नेहरू यांचे आत्मचरित्र, आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद ते जे. कृष्णमूर्ती आणि ओशो रजनीश यांचे तत्त्वज्ञान असे माझे वाचन चौफेर आहे. ‘गीतारहस्या’ची पहिली आवृत्ती आमच्याकडे आहे. माझी ग्रंथसंपदा देहू येथील घरी आणि पुण्यातील घरामध्ये अशी दोन ठिकाणी विभागली गेली आहे. वारकरी संप्रदायाचे घर असल्यामुळे सकल संत अभंगगाथा, ज्ञानेश्वरी हे साहित्य तर लहानपणीच वाचले आहे. अजूनही मी नित्यनेमाने वाचत असतो.

शिक्षणासाठी मी पुण्यामध्ये आलो तेव्हा वडील भेटायला यायचे तेही दर सोमवारी. लक्ष्मी रस्त्यावर त्यांची चक्कर असायची ती जुनी पुस्तके खरेदी करण्याच्या उद्देशातूनच. ते आम्हा मुलांना खाऊबरोबर ही पुस्तके देत असत. पुस्तके जुनी असली तरी माझ्यासाठी ती नवीच असायची. मी बरा वाचक आहे असा दावा निश्चित करू शकतो. माझ्या संग्रहात किमान दहा हजार पुस्तके तरी असावीत. पुस्तकांना विचारसरणी वज्र्य मानत नाही. विचारसरणी हा माणसाच्या प्रवृत्तीचा भाग आहे. सर्व गोष्टी माहीत करून घेण्यासाठी वाचन उपयोगी पडते. त्यामुळे वेळ मिळाला की वाचायचे हा शिरस्ता झाला. मी लिहित नसेल तेव्हा वाचत असतो. वाचनाचा तोटा नक्कीच होत नाही. माझ्या वाचनाला वडिलांसह गुरूंनी पाठबळ आणि प्रोत्साहन दिले. प्रा. सुरेंद्र बारिलगे, डॉ. य. दि. फडके, डॉ. यशवंत सुमंत, डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, प्रा. राजेंद्र व्होरा यांच्याशी चर्चा करून मी घडत गेलो. वाचत असलो तरी मी पुस्तकातला किडा झालो नाही. राजकारण, समाजकारण, गावकारण या गोष्टींमध्येही रस घेतला. या सर्व गोष्टी एकमेकांना पूरक होत्या. विविध चळवळींशीही जोडला गेलो. माझ्या वाचनाची कक्षा वेदकाळापासून ते २०१६ पर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टी समजून घ्यावे या उद्देशातून जाणीवपूर्वक विस्तारल्या.

Story img Loader