डॉ. सदानंद मोरे यांची खंत
प्रबोधनाची, जागृतीची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्राने आतापर्यंत भारतातील विविध चळवळींचे नेतृत्व केले आहे. यापुढेही भारताचे वैचारिक व राजकीय नेतृत्व महाराष्ट्राकडे आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत येथील दुफळी, दुही व राजकारणामुळे सध्या तशी परिस्थिती दिसून येत नाही, अशी खंत मराठी साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रबोधनाचा स्वतंत्रपणे अभ्यास व्हायला हवा, असे सांगून जातिभेद मोडून काढण्यासाठी समाजसुधारकांनी अथक प्रयत्न केले, मात्र आजही जनमानसात त्याबाबतची मानसिकता झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गांधी पेठ तालीम मंडळाच्या रौप्यमहोत्सवी व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाची परंपरा’ या विषयावर ते बोलत होते. आमदार लक्ष्मण जगताप, आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या वेळी मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे, भाऊसाहेब भोईर, गजानन चिंचवडे, मिलिंद एकबोटे, सुहास पोफळे आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी महाराष्ट्रातील प्रबोधनाची मोठी परंपरा असून, त्यावर संत तुकाराममहाराज यांचा प्रभाव आहे. कारण ते या परंपरेच्या केंद्रस्थानी आहेत.
छत्रपती शिवाजीमहाराजांनी राजकीय, सांस्कृतिक प्रबोधन केले. सततची प्रक्रिया असलेल्या प्रबोधनाचे नाते आधुनिकतेशी असते. ज्ञानाचा कधी शेवट होत नाही.
प्रतिकूल परिस्थिती असतानाही संतांनी प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम केले. कीर्तनाद्वारे त्यांनी वैचारिक जागरण घडवून आणले. महाराष्ट्रात धार्मिक प्रबोधनातूनच जागरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत प्रबोधनाची परंपरा कायम होती. यापुढे ही परंपरा कायम राखणे गरजेचे आहे. मात्र, मुलांना इतिहास कळत नाही, भाषेकडे दुर्लक्ष होते आहे.
सगळीकडे इंग्रजी शाळा निर्माण होत आहेत. असेच सुरू राहिल्यास काही वर्षांनंतर बिकट परिस्थिती होईल आणि तसे होऊ द्यायचे नसल्यास आपले स्थान बळकट करावे लागेल. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रबोधनाचा स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे व तो तरुण पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे.