आगामी ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली. संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे ३ एप्रिल रोजी अध्यक्षीय भाषण करतील.
संमेलनाध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी पूर्ण झाल्यावर डॉ. मोरे यांच्या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी बुधवारी केली. डॉ. मोरे यांना ४९८ मते मिळाली. भारत सासणे यांना ४२७, डॉ. अशोक कामत यांना ६२, तर पुरुषोत्तम नागपुरे यांना २ मते मिळाली.
या निवडणुकीसाठी १०७४ मतदारांपैकी १०२० मतदारांनी मतपत्रिका साहित्य महामंडळाकडे पाठवल्या होत्या. यापैकी २७ मते अवैध ठरली, तर एक मतपत्रिका कोरी होती. महामंडळाच्या पुणे येथील कार्यालयात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४९७ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला होता. डॉ. मोरे यांना पहिल्याच फेरीत ही मते मिळाल्याने पुढच्या फेऱ्यांची मतांची मोजणी करण्याची गरज उरली नाही. या वेळी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन आणि घुमान संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुण्यात परिषदेच्या सभागृहात गुरुवारी (११ डिसेंबर) सायंकाळी ६ वाजता डॉ. मोरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
‘‘मराठी सक्तीची करून काही उपयोग होणार नाही, पण मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी काही ठोस कृतिकार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक ज्ञानाचे संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. भा. पं. बहिरट आणि आधुनिक साहित्याचे अभ्यासक कवी दिलीप चित्रे यांना मी हा विजय अर्पण करतो. आपल्या उमेदवारीला पाठिंबा देऊन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अर्ज दाखल केला नाही, याबद्दल त्यांचे आभार. आज माझे मित्र दिलीप चित्रे यांचा स्मृतिदिन आहे. त्यांची आवर्जून आठवण होते. आळंदी येथे १९९६ मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी वारकरी संप्रदायातील अभ्यासक डॉ. बहिरट असावेत, अशी आमची इच्छा होती. तसे प्रयत्नही आम्ही केले. पण तो विचार रुजला नव्हता असे दिसते. आता हे पद आपणाला मिळाले आहे. त्यामुळे बहिरट व चित्रे यांची आवर्जून आठवणे होते. समाज कितीही प्रगत झाला तरी आजही संत साहित्याची आवश्यकता आहे. मात्र, वर्तमानाकडे सजगपणे पाहिले पाहिजे.’’
– डॉ. सदानंद मोरे, नवनिर्वाचित अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन