लोकमान्यांनी केवळ कर्मयोग सांगितला नाही, तर निष्काम कर्मयोग आचरणात आणला. अशा लोकमान्यांचे चरित्रलेखन करणारे साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या नावाचा पुरस्कार ही कामाची पावती आहे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी मंगळवारी व्यक्त केली.
केसरी-मराठा ट्रस्टतर्फे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘कर्मयोगी लोकमान्य’ या ग्रंथाला साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर यांना डॉ. रा. वि. वारदेकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्य अनंत धर्माधिकारी या वेळी उपस्थित होते.
जे लोकांना कंटाळत नाही आणि लोक ज्यांना कंटाळत नाहीत ते लोकमान्य, असे सांगून डॉ. सदानंद मोरे म्हणाले,की न. चिं. केळकर हे लोकमान्यांचे विश्वासू सहकारी होते. लेखक, पत्रकार-संपादक, व्याख्याते, विविध संस्थांचे आधारस्तंभ असलेल्या केळकर यांनी सांस्कृतिक क्षेत्राचे नेतृत्व केले. लोकमान्यांचे चरित्र लिहिणाऱ्या केळकर यांच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या चरित्रकाराला मिळणे हे माझे भाग्यच आहे. कर्मयोगी लोकमान्य हे चरित्र माझ्या हातून लिहून झाले आणि त्याला या पुरस्काराच्या रुपाने पावती मिळाली याचा आनंद आहे.
रुग्णांना आयुर्वेदाचे प्रचारक आणि हितचिंतक करू शकलो याचे समाधान असल्याचे त्रिलोक धोपेश्वरकर यांनी सांगितले. डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्य आणि केळकर यांच्यातील ऋणानुबंध उलगडले. स्वप्नील पोरे यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader