लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पूर्वीच्या काळी संकुचित वृत्तीचा लवलेश नव्हता. शाहिरांनी संतांवर, पंढरीवरही लावण्या केल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत कीर्तनकारांनी संसार म्हणजे मिथ्या आणि शृंगार हा विषय त्याज्य आहे असा प्रचार केला. परंतु, शृंगार नाकारणे, लावणीकडे तुच्छतेने पाहणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
संतसाहित्य आणि लोककलांचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या जन्मदिनानिमित्त संत विचार प्रबोधिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘ड वारकरी कीर्तनकार प्रमोद महाराज जगताप यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार ’ आणि प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांना ‘डॉ. रामचंद्र देखणे स्मृती लोककला पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी मोरे बोलत होते. प्रवचनकार चैतन्यमहाराज देगलूरकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. देखणे यांचे पुत्र डॉ. भावार्थ देखणे तसेच भाऊसाहेब भोईर, सचिन ईटकर या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा- पुण्यात सलग १८ तास अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!
देगलूरकर म्हणाले, डॉ. देखणे यांना कोणताही विषय त्याज्य नव्हता. हाती घेतलेले काम ते तडीस न्यायचे. त्यांच्या नावामागे मी जाणीवपूर्वक ‘वैकुंठवासी’ हा शब्द लावला नाही. कारण ते वैकुंठाला गेले नाही, तर जिथे राहिले तिथेच त्यांनी वैकुंठ निर्माण केला.
कीर्तन आणि तमाशा ही नदीची दोन टोक एकत्र आणण्याचे काम डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. त्यामुळे आजवर अनेक पुरस्कार मिळाले, असले तरी डॉ. देखणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मिळालेला हा पुरस्कार सर्वात मोलाचा आहे. -रघुवीर खेडकर
कीर्तनातील टाळ आणि लावणीतील चाळ यांना एकाच व्यासपीठावर सन्मानित करतात त्यांना देखणे म्हणतात. डॉ. देखणे यांनी बहुरुपी नुसताच मांडला नाही तर तो जगला. -प्रमोद महाराज जगताप