पुणे : ‘गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था विद्यापीठाच्या ‘नॅक’ मूल्यांकनात झालेल्या घसरणीला सध्याचे कुलपती आणि कुलगुरू जबाबदार नाहीत,’ अशी भूमिका विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजीव सन्याल यांनी मांडली आहे. ‘नॅकमध्ये मिळालेल्या ‘ब’ श्रेणीतून सध्याच्या नाही, तर पूर्वीच्या नेतृत्त्वाची कामगिरी प्रतिबिंबित होते,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
भारत सेवक समाज संस्थेचे अध्यक्ष दामोदर साहू यांनी गोखले संस्थेतील विविध विषयांवर असमाधान व्यक्त करून विद्यापीठाच्या कुलपतिपदी डॉ. सन्याल यांच्या जागी निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र विद्यापीठ अनुदान आयोग आणि प्रभारी कुलगुरू प्रा. शंकर दास यांना पाठवले होते. त्यावर, अशी नियुक्ती रद्द करणे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिनियमनांना अनुसरून नसल्याचे पत्र कुलगुरू दास यांनी साहू यांना लिहिले होते. त्यावरून विद्यापीठाच्या कुलपतिपदाबाबत तिढा निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर, डॉ. सन्याल यांनी साहू यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे.
‘नॅक मूल्यांकनात गोखले संस्थेला मिळालेली ‘ब’ श्रेणी आणि २४ मार्च २०२५च्या पत्राला मी प्रतिसाद न दिल्याबाबतचे मुद्दे २ एप्रिल २०२५च्या पत्रात उपस्थित करण्यात आले आहेत. कुलपतिपदाची सूत्रे मी ऑक्टोबर २०२४मध्ये स्वीकारली. प्रा. शंकर दास यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती नोव्हेंबर २०२४मध्ये झाली. नॅक मूल्यांकन जानेवारी २०२५मध्ये झाले. ही मूल्यांकन प्रक्रिया २०१८-२३ या कालावधीतील संख्यात्मक विदेवर आधारित होती. त्यामुळे या ‘ब’ श्रेणीतून सध्याच्या नेतृत्वापेक्षा पूर्वीच्या नेतृत्त्वाची कामगिरी प्रतिबिंबित होते,’ असे सन्याल यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, ‘भविष्यात श्रेणी सुधारण्यासाठी आम्ही करू इच्छित असलेल्या बदलांची यादी देऊ इच्छितो,’ असेही नमूद केले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे, ‘मी तुमच्या २४ मार्च २०२५ रोजीच्या पत्राला प्रतिसाद दिला नसल्याबाबत तुम्ही असामाधान व्यक्त केले आहे. मात्र, मी त्या आठवड्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, किंग्ज कॉलेज येथे व्याख्यान देण्यासाठी आणि यूकेच्या संसदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी परदेशी होतो. (त्याबाबत तुम्ही समाजमाध्यमे किंवा अन्य स्रोतांद्वारे खात्री करू शकता). मी ३० मार्च रोजी रात्री उशिरा भारतात परतलो. त्यामुळे या विषयात ३१ मार्च रोजी लक्ष घालू शकलो. त्या दिवशी ईदची सुटी होती, तरीही मी पुढाकार घेऊन गोखले संस्थेच्या भरती प्रक्रियेसंदर्भात ‘जेएनयू’च्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांना समिती नियुक्त करण्याची विनंती केली. त्यांच्याकडून मला १ एप्रिल रोजी सकारात्मक प्रतिसाद आला. त्यानंतर २ एप्रिलला मला तुमचे, ‘संस्थेची पूर्वीची प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी सक्षम कुलपती निवडणार असल्याचे’ पत्र मिळाले. माझी काहीही जबाबदारी नसताना ‘नॅक’ श्रेणीतील वाईट कामगिरीसाठी मला जबाबदार धरणे आणि पत्राला प्रतिसाद देण्यासाठी वेळ न देणे हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे माझे म्हणणे समजून घेतले जाईल आणि दोन्ही विषय सोडवले जातील अशी आशा आहे.’
आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह
भारत सेवक समाज संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवरही डॉ. संजीव सन्याल यांनी बोट ठेवले आहे. या व्यवहारांवर वित्त समितीने प्रश्न उपस्थित केल्याचे नमूद करून त्यांनी ‘एक्स’ या मंचावर काही कागदपत्रेही सादर केली आहेत. तसेच, कुलपतिपदासाठी कोणतेही मानधन मिळत नाही. मात्र, परिश्रम करणारे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी पुढे येऊन योग्य प्रश्न विचारणे ही माझी जबाबदारी असून, हे काम करत राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.