पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ. संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने शुक्रवारी (ता.१०) पदमुक्त केले होते. त्याच दिवशी उच्च न्यायालयानेही डॉ. ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून आधीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यामुळे डॉ. काळे यांनी तातडीने अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. काळे यांच्या नियुक्तीचा आदेश अद्याप वैद्यकीय शिक्षण विभागाने काढलेला नाही. ससूनच्या अधिष्ठातापदावरून त्यांची बदली करण्याचा आधीचा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केला होता. त्याचदिवशी अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील पलायन प्रकरणात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. ठाकूर दोषी आढळले. राज्य सरकारने डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केले तर अस्थिव्यंगोपचार विभागातील पथकप्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित केले. त्यामुळे अधिष्ठातापद रिक्त झाल्याने डॉ. काळे यांनी तातडीने शनिवारी (ता.११) या पदाचा कार्यभार स्वीकारला.

हेही वाचा >>>पुणे : ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ; वडगाव शेरीत सदनिका फोडल्या

इतरही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील याने पलायन केल्याप्रकरणी राज्य सरकारने चार जणांची चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर होते. या समितीने ललित पाटील प्रकरणात डॉ. ठाकूर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना दोषी धरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्राथमिक कारवाई करून खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी इतरही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

ससूनचे अधिष्ठातापद रिक्त झाले

होते. माझ्या नियुक्तीचा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने मी अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा आदेश सोमवारी (ता.१२) निघणे अपेक्षित आहे. – डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sanjeev thakur has been relieved from the post of superintendent of bj medical college and sassoon general hospital by the state government amy