पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील उपचाराच्या बहाण्याने ससून रुग्णालयात दाखल झाला होता. पाटील याच्यावर ससूनमधील कैद्यांच्या कक्षात उपचार सुरू होते. पाटीलवरच्या उपचाराची जबाबदारी ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पाटीलवर उपचार करताना जाणीवपूर्वक विलंब करण्यात आल्याचे डॉ. ठाकूर यांच्या जबाबातून निष्पन्न झाले आहे.

ललित पाटील प्रकरणात डॉ. ठाकूर यांचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन ते चार वेळा जबाब नोंदविला. ललितला नेमक्या कोणत्या आजाराने ग्रासले होते. त्याचे विश्लेषण करण्यात आले का? त्याच्यावर कोणते उपचार करण्यात आले, तसेच उपचारास विलंब का झाला? याबाबतची माहिती पोलिसांना जबाबातून मिळाली. डॉ. ठाकूर यांनी उपचारास विलंब करून ललितचा ससूनमधील मुक्काम वाढविला. पाटील याला रुग्णालयातून पसार होण्यासाठी अप्रत्यक्षपणे सहाय केले, असे डॉ. ठाकूर यांच्या जबाबातून निष्पन्न झाले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

पाटील ससूनमधील कैदी उपचार कक्षातून (वॉर्ड क्रमांक १६) साथीदारांच्या मदतीने अमील पदार्थांची विक्री करत होता. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी ससूनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सापळा लावून ललितच्या साथीदाराकडून दोन कोटी ३२ लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी ललितच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. ललितवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लगोलग शस्त्रक्रिया निश्चित कशी करण्यात आली, यामागचे कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.

हेही वाचा : ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघे बडतर्फ;आतापर्यंत चारजणांची पुणे पोलीस दलातून हकालपट्टी

ललित पाटील प्रकरणात डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या मुख्य सचिवांना प्रस्ताव पाठविला आहे. डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास डॉ. ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे. ललित ससूनमधून पसार झाल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. संजय मरसाळे यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. यापूर्वी येरवडा कारागृहातील समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस कर्मचारी, कारागृहातील दोन कर्मचारी, तसेच ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह २० जणांना अटक करण्यात आली आहे. डॉ. ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले आहे.

Story img Loader