लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यावर उपचार करणारे ससूनचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर यांना राज्य शासनाने अटक करावी, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शनिवारी केली. हे उपचार करणारे प्रमुख डॉक्टर होते. राज्य शासनाच्या वतीने नेमण्यात आलेल्या डॉ. दीपक म्हैसेकर समितीने दिलेला अहवाल नौटंकी असून डॉ. ठाकूर यांना अटक होऊन त्यांची नार्को चाचणी झाली पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

धंगेकर म्हणाले, ललित पाटील प्रकरणाचा तपास गतीने होणे आवश्यक आहे. दरमहा तब्बल १७ लाख रुपये देत होता, अशी कबुली पाटील याने दिली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून डॉ. ठाकूर यांना पदमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर शासनाने केवळ एक तासात चौकशी समितीचा अहवाल प्रकाशित केला. डॉ ठाकूर यांची विभागीय चौकशी करण्यात येईल, असे सरकार सांगत आहे. परंतु, डॉ. ठाकूर आणि पाटील यांच्यावर मोक्का गुन्हा दाखल होऊन नार्को चाचणी करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठवण्यात येईल. केवळ १० ते १२ जण अटक करण्यात आली आहे. त्याच्यापुढे तपास जात नाही. तपास करण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे. एक गुन्हेगार सोबत असलेल्या मंत्र्याचे नाव लवकरच समोर येईल.

आणखी वाचा-ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील १७ लाख कुणाला द्यायचा? आमदार रवींद्र धंगेकरांचे खळबळजनक आरोप

तपास योग्य दिशेने जाण्यासाठी डॉ. ठाकूर याला बडतर्फ करणे आवश्यक आहे. पाटील याने ज्या पोलिसांना पैसेवाटप केले ते त्यांच्याकडून जमा करून घेत संबधित लोकांना आरोपी करणे गरजेचे आहे, अशी मागणीही धंगेकर यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sanjeev thakur should be arrested mla ravindra dhangekars demand pune print news vvk 10 mrj
Show comments