पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे देण्यात आला आहे. तसे आदेश शासनाने काढले आहेत. डॉ. परदेशी सध्या राज्याचे नोंदणी महानिरीक्षक असून या कामासह ते आता पीएमपीचीही जबाबदारी सांभाळतील. राज्य शासनाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याचा विश्वास डॉ. परदेशी यांनी व्यक्त केला.
पीएमपी सक्षम करण्यासाठी आयएएस दर्जाचा पूर्ण वेळ अधिकारी पीएमपीला दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत केली होती. पीएमपीच्या स्थापनेपासून या कंपनीला भारतीय प्रशासकीय सेवेतील पूर्ण वेळाचा अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे पीएमपीला पूर्ण वेळाचा अधिकारी देण्याची मागणी सातत्याने होत होती. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात बोलावलेल्या बैठकीतही ही मागणी लोकप्रतिनधींनी केली होती. त्याबाबत बोलताना पीएमपीला चांगला आयएएस अधिकारी देण्याचा निर्णय आम्ही केला असून राज्य शासन आणि दोन्ही महापालिका पीएमपीच्या पाठीशी उभ्या राहतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते.
पीएमपीच्या अकार्यक्षम कारभारावर आणि पीएमपीमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर सध्या जोरदार टीका होत असून पीएमपीचे विभाजन करून पूर्वीप्रमाणेच पीएमटी व पीसीएमटी या वाहतूक संस्था पुणे व पिंपरी महापालिकांनी स्वतंत्ररीत्या चालवाव्यात, अशी मागणी होत आहे. पीएमपीला पूर्णवेळाचा अधिकारी मिळाला नसला, तरी मागणी काही अंशी तरी मान्य झाली आहे. डॉ. परदेशी पिंपरीचे आयुक्त असताना काही महिने त्यांच्याकडे पीएमपीचा कार्यभार होता. त्यामुळे त्यांना या वाहतूक संस्थेच्या कामकाजाबाबतची माहिती आहे. सध्या पिंपरीच्या आयुक्तांकडे पीएमपीचा अतिरिक्त कार्यभार आहे.
राज्य शासनाकडून या निर्णयासंबंधीचे आदेश प्राप्त झाले आहेत. शासनाने दिलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देईन, असे डॉ. परदेशी यांनी शुक्रवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा